महान्यूज: आजची गझल
गळ्याला भार तुळशीच्या मण्यांचा फार होताना
धरावी का तुझी एकादशी लाचार होताना?
स्वतःची कीव यावी एवढी बेकार नाही मी
मनाला पाहवत नाही असे बेकार होताना
समजली जेवढी दुनिया पुरे होते तुझ्यासाठी
तुला झेपायचे नाही नवे व्यवहार होताना
तुझे आरोपही मी एवढ्यासाठी सहन केले
तिरस्कारामधेही जीव थोडाफार होता ना?
उगाचच घेतले मांडीवरी आजी तुझे डोके
किती होते कठीण बघणे तुला गपगार होताना
अता मी भाकरीवर एवढ्यासाठी लिहित नाही
कुणीही ठेवते नावे व्यथा साकार होताना
सहजतेने जिवाला गारवाही लाभतो कोठे?
किसावे लागते बर्फास गारेगार होताना
कशाला पेन तू देतोस आहे राधिके हाती?
लिहावे काय कृष्णा आसवांचे क्षार होताना ?
गझलकार-राधिका प्रेमसंस्कार
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड










