मुंबई : महान्यूज लाईव्ह
नेपाळमधील तानाहून जिल्ह्यातील अबू खैरनी परिसरात महाराष्ट्रातून देवदर्शनासाठी गेलेली एक बस नदीत कोसळली. या बसमध्ये 41 प्रवासी होते. त्यातील काही मृतदेह हाती लागले असून जळगाव जिल्ह्यातील 14 जणांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्रातील काही अधिकारी राज्य सरकार नेपाळला पाठवणार असून, हे मृतदेह ताब्यात घेतले जाणार आहेत.
उत्तर प्रदेश पासिंगची युपी एफ टी 76 23 या क्रमांकाची बस या नदीत कोसळली. त्यावेळी या बस मध्ये तब्बल 41 प्रवासी होते. त्यापैकी 14 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 16 ते 17 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान हे सर्व 14 प्रवासी जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे.
नेपाळमध्ये काठमांडूला ही बस निघाली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रवासी होते. उत्तर प्रदेशातील बस घेऊन हे सर्वजण नेपाळमध्ये काठमांडू येथील पशुपतिनाथ देवदर्शनासाठी गेले होते.
दरम्यान हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असून राज्य सरकारने नेपाळ दुतावासाशी संपर्क साधत उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने जळगाव जिल्ह्यातील प्रांताधिकारी व पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना नेपाळला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या पथकाशी मंत्री गिरीश महाजन व मंत्री अनिल पाटील हे संपर्कात राहणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली.











