दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाई तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या बावधन गावात आज वाई पोलिसांनी छापा टाकला या छाप्यामध्ये पोलिसांना पिस्तूल बंदूक आढळून आले त्यावरून अविनाश पिसाळ यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश पिसाळ याच्या घरावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फौजदार बिपीन चव्हाण, सहाय्यक फौजदार मदन वरखडे, श्रीनिवास बिराजदार, श्रावण राठोड, रुपेश जाधव, महिला पोलिस सुतार यांच्या पोलिस पथकाने सापळा रचून छापा टाकला. तेव्हा एक बंदुक व एक पिस्तुल आढळून आली. ती बेकायदेशीररित्या बाळगले असल्याने ती जप्त करून अविनाश पिसाळ याला अटक करण्यात आली.
वाईचे पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांना रविवारी (ता.१८ रोजी) दुपारी खास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, बावधन (ता.वाई) येथील अविनाश पिसाळ याच्या राहत्या घरात त्याने एक बंदूक लपवून ठेवली असून घरासमोरील चारचाकी वाहनात एक पिस्तुल लपवून ठेवले आहे. ही माहिती मिळताच पोलीस पथकाला या ठिकाणी तैनात करून अविनाश पिसाळ यांच्या घरावर छापा टाकण्याची सूचना केली.











