दौंड तालुक्यातील दोन डॉक्टरांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील चुकीच्या रिपोर्ट नंतर आता दौंड तालुक्यात नवा एपिसोड सुरू झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील चुका सामान्य रुग्णांना किती भोगावे लागतात हे दौंड तालुक्यातील यवत येथे दिसून आले असून यवत येथील एका डॉक्टरच्या चुकीपायी व सातशे रुपयांच्या मोहापायी एका बालकाला पुढे आयुष्यभर अपंगत्व घेऊन आयुष्य काढावे लागणार आहे.
दौंड तालुक्यातील यवत येथील जयवंत नर्सिंग होमचा डॉक्टर चैतन्य भट आणि केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ठेकेदारी पद्धतीने वैद्यकीय काम पाहणारा डॉक्टर अजित प्रल्हाद रणसिंग या दोघांच्या मूर्खपणामुळे एका बाळाला कायमचे अपंगत्व आले आहे. या दोघांनी जन्म झालेल्या बाळाला चुकीच्या पद्धतीने लस देऊन उपचार केले. त्यामुळे इन्फेक्शन होऊन त्या बाळाला कायमचं अपंगत्व आले.
बालरोगतज्ञ नसतानाही त्यांनी त्या बाळावर उपचार केले, त्यांचा हलगर्जीपणा त्या बाळाला कायमचं अपंगत्व देऊन गेला. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली याबाबत सविस्तर माहिती अशी की, यवत येथील तात्याबा सोनबा दोरगे यांच्या सूनबाई संध्या अमोल दोरगे या गर्भवती असल्यापासून यवत येथील जयवंत नर्सिंग होम मधील डॉक्टर चैतन्य भट याच्याकडे उपचार सुरू होते.
17 मे 2023 रोजी संध्या यांच्या पोटात दुखु लागल्याने त्यांना प्रसुतीसाठी जयवंत नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले व 18 मे रोजी प्रसुती झाली. त्यांनी मुलीला जन्म दिला. त्यानंतर डॉक्टर भट याने बाळाला लस द्यावी लागेल असे सांगितले. मात्र बाळाचे वजन कमी असल्यास देऊ नका, आम्ही नंतर देऊ असे दोरगे कुटुंबानी सांगितले. मात्र त्यावर डॉक्टर चैतन्य भट याने सातशे रुपयांकडे बघू नका, काही होत नाही, टेन्शन घेऊ नका असे सांगून केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील ठेकेदारी पद्धतीने काम पाहणारे डॉ. अजित रणसिंग याच्याकडून 20 मे 2023 रोजी बाळाला जयवंत नर्सिंग होम या ठिकाणीच कावीळ ब, पोलीओ आणि पोलीओ आणि बीसीजी लस दिली.
त्यापैकी काविळीची हिपॅटायटिस बी लस डॉक्टरांनी दोरगे कुटुंबांच्या समोरच बाळाचे उजवे पायाचे मांडीत दिली. त्यानंतर बाळाची आई व बाळाला पूर्ण उपचार करुन 21 मे रोजी डॉ. चैतन्य भट याने डिस्चार्ज दिला. मात्र त्यानंतर बाळाची उजवी मांडी सुजली. त्यामुळे 4 दिवसांनी संध्या यांना ड्रेसींग करण्यासाठी डॉ. चैतन्य भट याच्याकडे नेले. त्यावेळी बाळाची उजवी मांडी सुजली असल्याचे सांगीतले होते. त्यावेळी डॉ.भट याने बाळाची मांडी बर्फाने शेकण्याचा सल्ला दिला, परंतु बर्फाने शेकूनही सुज कमी न झाल्याने पुन्हा डॉ. भट याच्याकडे नेले आणि मांडीची सुज कमी झाली नसल्याचे सांगीतले होते.
त्यावेळीही त्याने पुन्हा मांडी बर्फाने शेकण्यास सांगितले. त्याप्रमाणे दररोज बाळाची मांडी बफनि शेकत होते. मात्र तरीही सुज कमी न झाल्याने घाबरून बाळाचे वडील अमोल याने डॉ. भट याला फोन करून बाळाची उजव्या मांडिची सुज वाढली आहे असे सांगितले त्यावेळी डॉ. भट याने पुन्हा नेहमीप्रमाणे बाळाची मांडी बर्फान शेकण्यास सांगत तुम्ही टेंशन घेवू नका असे सांगितले. त्यानंतर पुन्हा बाळाची मांडी बर्फाने शेकली, मात्र सुज वाढत गेली.
त्याचा फोटो डॉ. भट याच्या मोबाईलवर पाठवला. त्यावेळी डॉक्टर भट त्यांनी बाळाला बारामती येथील डॉ. अमित कोकरे यांच्याकडे घेवून जाण्यास सांगितले. डॉ. अमित कोकरे यांनी बाळाचा एक्स रे काढला व त्यानंतर डॉ. कोकरे यांनी पुणे येथील डॉक्टर समिर देसाई यांच्याकडे बाळाच्या पुढील उपचारासाठी पाठवले. डॉ. देसाई यांनी बाळ ओवी अमोल दोरगे हिला तपासून बाळाचे उजवे मांडीचे हाडामध्ये पू झाला आहे, तसेच बाळाचे पायाचे मांडीचे हाड कुजले आहे त्यामुळे तत्काळ ऑपरेशन करण्याची गरज आहे. तुम्ही बाळाला घेवून केईएम हॉस्पिटल पुणे येथे जा तेथे सर्व सुविधा आहे व माझी केईएम हॉस्पिटल पुणे मध्ये ओपीडी आहे असे सांगीतले.
बाळावर 21 जून 2023 ते 07 जुलै 2023 पर्यंत उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान डॉ. देसाई यांनी सांगितले की, डॉक्टरांनी बाळाचे उजवे पायाचे मांडीवरती चुकीच्या पध्दतीने दिलेल्या लसीमुळे बाळाचे पायाचे मांडीला गंभीर दुखापत होऊन हाडामध्ये इन्फेक्शन झाले. याप्रकरणी तात्याबा दोरगे यांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली. सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी त्या प्रकारची सखोल चौकशी करत तपासाचे सूत्रे हाती घेतली. डॉक्टर चैतन्य भट व डॉक्टर रणसिंग यांची चौकशी केली. पुणे येथील ससून रुग्णालयातील वैदयकीय अधिक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करून व कागदपत्रांची पडताळणी करुन यवत येथील जयवंत नर्सिंग होमचे डॉक्टर चैतन्य भट याने बालरोग तज्ञ नसताना सुध्दा बाळ ओवी अमोल दोरगे हिच्यावर उपचार करुन हलगर्जीपणा केल्याचे अहवाल दिला. याप्रकरणी जयवंत नर्सिंग होम रुग्णालयाचे डॉ. चैतन्य अरविंद भट व ग्रामिण रुग्णालय केडगाव येथील डॉ. अजित प्रल्हाद रणसिंग या दोघांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.











