राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस हद्दीत गोलांडी मळा परिसरात मागील काही महिन्यांपासून आढळणाऱ्या बिबट्याच्या मादीने नुकताच दोन पिल्लांना जन्म दिला आहे. शेतकरी मोहित काळे यांच्या उसाच्या शेतात ही पिल्ले आढळून आली आहेत. त्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या आणखीनच वाढल्याने शेतकऱ्यांसह नागरिक भयभीत झाली आहेत.
बिबट्यांची वाढती संख्या ही चिंताजनक व धोकादायक आहे. बिबट्यापुढे दौंड वन विभागाने हात टेकले आहेत. बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आणि अभयारण्यात आढळणारा बिबट्या आता मागील काही वर्षापासून दौंड तालुक्यात कुटुंबाने आढळत आहे. सुरुवातीला भीमा नदीच्या लगतच्या गावांमध्ये आढळणारा बिबट्या आता दौंड तालुक्यात कुठेही दिसू लागला आहे.
तालुक्यातील राहू बेटापासून ते पूर्व भागातील राजेगाव पर्यंत व मध्यभागी असलेल्या यवत, पाटस परिसरातही बिबट्याने वास्तव्य केले आहे. एवढे बिबटे तालुक्यात आलेत तरी कोठून ? ते आलेत की त्यांना आणून सोडलं ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्यातील बिबट्यांची ही वाढती संख्या भविष्यात चिंताजनक आणि धोकादायक बनणार आहे. बिबट्याने आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांची शिकार केली आहे.
त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांना शेतात काम करण्याची मुश्किल झाले आहे. नागरिकांना जसे बिबट्यापासून भीती आहे तसेच बिबट्यांनाही माणसापासून भीती आहे. बिबट्यांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पाटस हद्दीत असलेल्या गोलांडी मळ्यात मागील वर्षापासून वास्तव आहे.
मेंढपाळाच्या कळपावर हल्ला करुन शेळया मेंढ्यांची शिकार केल्याची घटना घडली होती. मोहित काळे यांच्या शेताच्या आवारात बिबट्या फिरताना वन विभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला होता. वन विभागांना हा बिबट्या जेरबंद करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून परिसरातील ग्रामस्थ दौंड वन विभागाकडे करीत आहेत.
मात्र घटनास्थळी पाहणी करणे, भेट देणं आणि नागरिकांनी काळजी घ्यावी हे सांगण्यापलीकडे वनविभागाने काहीच केलं नाही. आता तर त्या बिबट्या मादीने दोन पिल्लांना मोहित काळे यांच्याच उसाच्या शेतात जन्म दिला. त्यामुळे बिबट्यांची संख्या या भागात आणखीनच वाढवण्याची शक्यता आहे. परिणामी या परिसरात शेतकरी, महिला आणि शालेय मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.











