दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
पुणे सातारा महामार्गावर संध्याकाळच्या सहा वाजण्याच्या सुमारास एक बस अचानक पेटली यामध्ये एका प्रवाशाचा अक्षरशः कोळसा झाला. या घटनेने महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
सांगली आगाराची त्र्यंबकेश्वर पलुस ही बस त्रंबकेश्वर येथून प्रवाशांना घेऊन पुणे सातारा महामार्गावरुन पलुसकडे निघाली होती. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही बस भरघाव वेगाने जात असताना भट यांच्या पेट्रोल पंपासमोर आली असताना अचानक शॉकसर्कीट होऊन बसला आग लागली.
ही आग भडकली गेली आणि काही कळण्याच्या आतच अख्खी बस जळून खाक झाली. यात दुर्दैवीरीत्या एका प्रवाशाचा आगीमध्ये भाजून मृत्यू झाला. या प्रवासाचा अक्षरशः कोळसा झाला होता. या प्रवाशाचे नाव अद्याप समजू शकले नसून, या बसमधून इतर प्रवासी कशा पद्धतीने बाहेर पडले याचीही माहिती अद्याप मिळालेली नाही.
दरम्यान या घटनेची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे यांना समजताच ते आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन घटना स्थळावर दाखल झाले होते. या धक्कादायक घटनेमुळे पुणे सातारा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.











