इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे घडली घटना..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : ऑनलाइन सर्विस सेंटरच्या दुकानात घुसून जातीवाचक शब्द वापरात सेंटर चालकाच्या गचांडीला धरून दुकानाबाहेर ओढून मारहाण केली असल्याचा प्रकार इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे घडला.
याप्रकरणी राष्ट्रवादीच्या युवा नेत्यासह पाच जणांवर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण प्रकरणी ऑनलाइन सर्विस सेंटर चालक सोमनाथ शिवाजी कुचेकर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी (दि.12) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकीच्या बसस्थानका शेजारील मुख्य रस्त्यावरील ऑनलाइन सेंटर दुकानात घडली.
इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अमोल शंकर राऊत,आदित्य हेगडे, टिल्या राऊत, तेजस बादले ,अमोल राऊत यांनी दुकान समोर येऊन सोमनाथ कुचेकर यास मातंग समाजाच्या दुकानदाराचे दुकान आम्ही गावात चालू देणार नाही असे म्हणत त्यातील अमोल शंकर राऊत यांनी दुकानात माझ्या गचांडीच धरून जातीवादी शब्द वापरत दुकानाचे बाहेर ओढले.
तुझे दुकान येथे चालू देणार नाही. तुझे दुकान बंद करून आम्ही आमचे दुकान चालू करणार आहोत, असे जातीवाचक शिवीगाळ करून हाताने मारहाण करू केली. तसेच आदित्य हेगडे , टिल्या राऊत, तेजस बादले यांनी कुचेकर यास हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीवेळी कापड दुकानदार अमोल राऊत याने सोमनाथ कुचेकर यास डोक्यात दगड मारून तेथे समोर पडलेला फायबरचा स्टूल डोक्यात मारला.व दुखापत करून शिवीगाळ करीत तेथून निघून गेले. अशा आशयाची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मारहाण प्रकरणी अमोल शंकर राऊत,आदित्य हेगडे , टिल्या राऊत, तेजस बादले, अमोल राऊत ( सर्व राहणार निमगाव केतकी, ता इंदापूर जि पुणे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 115(2), 351(2), 352, 189(2), 191(2), 190, सह अ जा अ जा का कलम 3(1),(आर),(एस),3(2)(व्ही ए), ना ह सं अधिनियम कलम 7(1)(डी).अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करत आहेत.
आरोप करण्यात आलेल्यामध्ये अमोल राऊत हा आमदार दत्तात्रय भरणे यांचा कार्यकर्ता आहे.











