सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : आमची बदनामी का केली असा जाब विचारल्याच्या कारणाचे रूपांतर काही वेळाने मारहाणीत झाले. एकास मारहाण करण्यात आल्याची घटना निमगाव केतकी येथील सराफवाडी चौकात घडली. याप्रकरणी सहा जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दिनांक 12) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
या मारहाण प्रकरणी कॉन्ट्रॅक्टर अमोल शंकर राऊत राहणार निमगाव केतकी तालुका इंदापूर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (दि.12) रोजी सकाळी नऊ च्या सुमारास निमगाव केतकी हद्दीत सराफवाडी चौकात मी माझे पत्र्याचे शेडचे दुकानाचे बाहेर बसलो असताना रतिलाल कुचेकर यांना तुमच्या पुतण्याने माझी बदनामी का केली असे विचारले असता त्यांनी मला आम्ही तुझी बदनामी अजून करणार, तुला काय करायचे ते कर, असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली.
त्यानंतर थोड्या वेळाने रोहन कुचेकर, शिवाजी कुचेकर आणि त्याच्यासोबत तोंडाला रुमाल लावलेले अनोळखी तीन इसमांनी मला शिवीगाळ केली. रोहन कुचेकर याने मला तू माझे चुलते रतिलाल कुचेकर यांना बदनामी केल्याबाबत का विचारणा केली असे म्हणून त्याने हातातील लाकडी काठीने माझे डोक्यात मारून खाली पाडून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवाजी कुचेकर यांनी माझे गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन व खिशातील 5000 रुपये जबरदस्तीने काढून घेऊन तुझेवर ॲट्रॉसिटी करतो अशी धमकी दिली. तसेच त्याचे सोबत असलेल्या तीन अनोळखी इसमांनी मला हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तेथून निघून गेले. असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी रतिलाल कुचेकर, रोहन उर्फ टक्या कुचेकर , शिवाजी कुचेकर (सर्व राहणार निमगाव केतकी ता. इंदापूर जि. पुणे) व अनोळखी तीन इसम नाव पत्ता माहित नाही त्यांचे विरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीच्या मजकुराचे फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 118(1),119(1),115(2),351(2)352,189(2),190,191(1). नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गायकवाड करत आहेत.











