नागपूर : महान्यूज लाईव्ह
सोशल मीडिया जेवढा चांगला तेवढाच वाईट. पोलीस हवालदाराच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली. मात्र जेव्हा कारण समजलं, तेव्हा प्रत्येक पालकाला आतून चिंता वाटू लागली आहे. कारण दहावीचं वर्ष असताना इंस्टाग्राम मुळे अभ्यासाची भीती वाटू लागली आणि आता मी पूर्ण अपयशी ठरले असून आता जग सोडून जात आहे, अशी चिठ्ठी लिहीत दहावीच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नागपूर जिल्ह्यातील शहरातील हुडकेश्वर भागातील महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या पूर्णा निलेश ढोणे या 15 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडली. पूर्णा हिचे वडील नागपूर शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेत हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
पूर्णा यंदा दहावीच्या वर्षात शिकत होती. ती चुणचुणीत होती. हुशार होती. मात्र घरातील मोबाईल तिच्या हाती लागला आणि हळूहळू तिला अभ्यासात लक्ष लागेना. तिचा गृहपाठ पूर्ण होत नसल्याचे तिचे शिक्षक सांगू लागले आणि एकूणच वर्गात तिचा परफॉर्मन्स कमी झाल्याने शिक्षकांकडून पालकांना तक्रारी येऊ लागल्या.
पालकही तिला मोबाईलचा नाद सोडण्यास सांगत होते आणि अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगत होते. महिन्यापासून ती याच कारणामुळे नैराश्यात गेली. यावर्षी आपण नापास होतो की काय अशी तिला भीती वाटू लागली आणि याचे कारण तिच्या लक्षात आल्यानंतर तिने हे जग सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
रविवारी रात्रीच्या वेळी कुटुंबासमवेत जेवण केल्यानंतर ती झोपी गेली आणि याच दरम्यान पहाटेच्या वेळी तिने गळफास घेतला. सकाळी उठल्यानंतर तिच्या आईने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.











