बारामती : महान्यूज लाईव्ह
लग्नाचे आमिष दाखवून बारामतीच्या भाजी विक्रेत्या युवकाला फसवून तब्बल चार लाख रूपये व सोन्याचे दागिने लुबाडणाऱ्या टोळीवर अखेर बारामती शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला. सदर युवक मागील वर्षभरापासून पोलिस स्टेशन येथे पाठपुरावा करतं होता.
त्याने पोलिस निरीक्षक, पोलिस अधीक्षक व उपअधीक्षक यांचेकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली होती, परंतू त्याची दखल घेतली गेली नाही. शेवटी त्याने न्यायालयात धाव घेतली व तिथे त्याची बाजू नामांकित वकिल ॲड. सचिन वाघ व ॲड. विक्रम शिंदे यांनी मांडली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश डी.पी. श्रीमती पुजारी यांनी आरोपी नामे ͬगिता संभाजी जाधव, संतोष एकनाथ साळुंखे, महेश बापु चोबे, सुनिता अग्रवाल, धोंडीराम सूर्यभान फुले, रामभाऊ बर्चे, पूजा कचरू नीलपत्रेवर, जिजाबाई संभाजी जाधव या आठ आरोपीं विरोधात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३) अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश बारामती पोलिस स्टेशन यांना दिले.
सदर आरोपींविरोधात तब्बल एक वर्षाने गुन्हा दाखल झाला आहे. सदर आरोपींनी लग्न लावून देतो म्हणुन देवाची आळंदी येथील खाजगी कार्यालयात फिर्यादी यांस घेऊन जाऊन चार लाख एवढी रक्कम घेतली व गीता जाधव या खोट्या नवरीला सोन्याचे दागिने घालायला लावले व लग्न लावून घरी आल्यावर नवरी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लग्नात घातलेले दागिने व घरातील दागिने घेऊन पसार झाली. सदर टोळीतील संतोष साळुंखे हा फिर्यादीच्या गावातील गुनवडी (ता. बारामती) या गावचा तर महेश चोब हा मळद (ता. बारामती) येथील रहिवाशी आहे तर बाकीचे आरोपी बाहेर गावचे आहेत. सदर घटनेने उशिरा का असेना पण वकिलांचे मदतीने न्यायासाठी पहिले पाऊल पडले आहे असे म्हणण्यात हरकत नाही.











