सातारा : महान्यूज लाईव्ह
सकाळी वर्षाविहाराच्या निमित्ताने सगळे मित्र कास पठारावर निघाले मध्ये घाटामध्ये छोटे छोटे धबधबे बघून डान्स देखील केला तो सोशल मीडियावर वायरल देखील केला आणि संध्याकाळी परत जाताना कास पठारच्या रस्त्यावर गणेशखिंडीनजिक स्कॉर्पिओ गाडी तीनशे फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत एकाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला तर बाकीचे सगळे जखमी झाले.
यवतेश्वर घाटाजवळील असणाऱ्या गणेश खिंडीत स्कॉर्पिओ जीप 300 फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही जीप दरीमध्ये कोसळल्याचे सांगितले जात आहे. या गाडीमध्ये सात प्रवासी प्रवास करत होते. यामधील एक मृत व एक जणांची प्रकृती चिंताजनक असून, इतर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव या ठिकाणचे हे सर्वजण आहेत. सकाळी वर्षाविहाराच्या निमित्ताने हे सर्व मित्र कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथून साताऱ्यातील कास पठार, बामणोली या ठिकाणी गेले होते. संध्याकाळी उशिरा कास पठाराहून सातारा कडे येत असताना ही घटना घडली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या टीम ने मुसळधार पावसात जीवाची बाजी लावून जखमींना व मृत व्यक्तींना बाहेर काढले.











