पालघर : महान्यूज लाईव्ह
वधुवर सुचक मंडळाकडील माहितीनुसार, विवाह संस्थांच्या संकेतस्थळावरून तसेच वर्तमानपत्रातील वर पाहिजे या जाहिरातीवरून तो विधवा, घटस्फोटीत महिलांना हेरून त्यांच्याशी लग्न करायचा. आणि त्यांची आर्थिक फसवणूक करायचा. कल्याण मधील या लखोबा लोखंडेला नुकतंच पोलिसांनी पकडलं आणि केलेल्या चौकशीत त्यानं आतापर्यंत 25 जणींशी अशाच स्वरूपात लग्न करून त्यांची लूट केल्याचे उघड झाले.
फिरोज नियाज शेख या 43 वर्षाच्या भामट्याने अशी फसवणुकीची लग्न केली आहेत आणि अनेक महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर आतापर्यंत सहा गुन्हे दाखल आहेत. तो सहा वेळा तुरुंगातून जाऊन आला, पण तरीही त्याची लग्नाची खाज काही गेली नाही. मुळात लग्न प्रकरण हेच त्याचं धंद्याचं भांडवल होतं.
सन 2015 पर्यंत त्याने पुण्यात हा धंदा केला आणि चार महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली. तेव्हापासून आत्तापर्यंत त्याने 25 लग्न केली एका प्रकरणात मात्र त्याने महिलेची केलेली फसवणूक उघड झाली आणि नालासोपारा भागातील महिलेने त्याच्या विरोधात सहा लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.
कल्याणच्या परिसरातून फिरोज शेखला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून पोलिसांनी तीन लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये अनेक महिलांचे एटीएम कार्ड, चेक बुक, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, लॅपटॉप, सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.











