राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
पुणे आणि परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह खडकवासला परिसर आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, हवेली, वेल्हा, जुन्नर, खेड या तालुक्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
अर्थात हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे जिल्ह्यात शहर आणि घाटक्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मागील आठवड्यातही अशा प्रकारची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. ती संपूर्ण जिल्ह्यात जाहीर करण्यात आली होती. यावेळी मात्र ज्या ठिकाणी पावसाचा वेग आणि पावसाचे प्रमाण जास्त आहे, अशाच ठिकाणी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे या सुट्टीतून इंदापूर, दौंड, बारामती, शिरूर आणि पुरंदर हे तालुके वगळण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी या संदर्भातील आदेश जारी केला असून पुणे शहरांमध्ये पाणी सखल भागात साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तर घराबाहेर पडावे. त्याचबरोबर खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक्स प्रती सेकंद या वेगाने पाणी सोडले जात असल्याने विविध पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.











