महान्यूज : आजची गझल
घराबाहेर काटेरी-व्यथा, कुंपण असू शकते
तिचे असणे घराच्या आत तारांगण असू शकते
कुणाची जिंदगी चौफेर दरवळते सुगंधाने
कुणाची जिंदगी आयुष्यभर तारण असू शकते
कधी कमवून सुद्धा जाळण्यासाठी नसू शकते
कधी बेरोजगाराच्या घरी सरपण असू शकते
कसा दिसतोस तू हे आरसा सांगू तुला शकतो
स्वभावाचे परंतू वागणे दर्पण असू शकते
कशाला चार भिंतींच्यामधे शोधायला जावू ?
तुझ्या हसण्यामधेही आपले घरपण असू शकते
कुणाच्या बांधले जातात पायी चाळ दुःखांचे
कुणाच्या जन्मभर पायामधे पैंजण असू शकते
जरी आली न इथली पाखरे परतून जागेवर
जरा समजून घ्या, काहीतरी अडचण असू शकते’
गझलकार-एजाज शेख, भुसावळ
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











खूप सुंदर
सुंदर