घटना बिहार राज्यातील आहे. रेल्वेच्या लाईन वरती मजूर म्हणून काम करणाऱ्या संतोष लोहार याची ही कहाणी. पाहिलं तर गमतीची; निरखून पाहिलं तर धोक्याची आणि सखोल पाहायला गेलं तर संशोधनाची, अशी त्याचीही साठा प्रश्नांची पाचा उत्तरातील सफल संपूर्ण कहाणी.
या संतोष लोहार ला विषारी सापाने चावा घेतला. मूळच्या झारखंड राज्यातील लातेहार जिल्ह्यातील पांडूका या गावचा रहिवासी असलेल्या संतोष लोहार ला गावाच्या परिसरात असलेली सर्वसाधारण समजूत उपयोगी पडली असावी, कारण सापाने त्याला चावतात तरी तोच साप तसाच वेगाने पकडला आणि तो तब्बल तीन वेळा सापाला चावला. त्याला साप चावलेला समजताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याला काहीच झाले नाही.
पण पुढची गोष्ट अशी की, संतोष ज्या सापाला चावला तो साप मात्र मरून गेला. संतोष ला काहीही झाले नाही. असे का झाले? त्याचे आश्चर्य अनेकांना वाटते आहे, पण झारखंड राज्यात सर्वसाधारण समजूत अशी आहे की, साप चावल्यानंतर सापाच्या पाठीवर चावा घेतला, तर त्या व्यक्तीच्या शरीरातील विष पुन्हा सापाकडे जाते अशी एक समजूत आहे.











