ज्ञानेश्वर रायते, बारामती
बारामतीच्या उद्योजकाने मशीनचे पार्ट चीन मधून मागवले. अँटी-डम्पिंग ड्युटी माफ करण्यासाठी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपये मागितले. उद्योजकाने थेट सीबीआयची मदत घेतली. 80 हजार रुपयांची लाच घेताना कस्टमचा अधिकारी साकेत कुमार याला अटक करण्यात आली.
इंदापूर तालुक्यातील मूळचे सणसर येथील युवा उद्योजक अक्षय निंबाळकर यांचा बारामतीतील एमआयडीसी मध्ये लेझर कटिंग चा कारखाना आहे. या कारखान्यासाठी काही आधुनिक मशिनरीची आवश्यकता होती. ही मशिनरी चीनमध्ये मिळते, अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चीनमधून ही मशिनरी मागवून घेतली.
सहा जुलै रोजी ही मशिनरी मुंबईच्या अंधेरी पूर्व येथील इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलच्या कुरिअर सेलमध्ये आली. मात्र येथील सेलमध्ये तैनात असलेला कस्टमचा अधिकारी साकेत कुमार याने यावर 2 लाख 80 हजार रुपयांची अँटी डम्पिंग ड्युटी असल्याचे ही ड्युटी माफ करायचे असेल तर त्याच्या निम्मे म्हणजे दीड लाख रुपयांची लाच द्यावी लागेल असे सांगितले. तडजोडीअंती ही लाच 80 हजार रुपयावर ठरली.
मात्र तक्रारदार उद्योजक महेश काटकर व अक्षय निंबाळकर यांनी थेट सीबीआय कार्यालय गाठले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना वस्तुस्थितीत सांगितली. अनेक उद्योजकांना नव्याने उद्योग करायचे आहेत, मात्र अशा अधिकाऱ्यांमुळे प्रचंड मनस्ताप होतो हे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सांगत तक्रार दाखल केली. सीबीआयने या संदर्भातील पडताळणी केली आणि 80 हजार रुपयांची लाच घेताना कस्टम अधिकारी साकेत कुमार याला अटक केली.
त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली असून यादरम्यान सीबीआय आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी साकेत कुमारच्या घराची देखील झडती घेतली. नवी मुंबईतील उळवे या ठिकाणच्या साकेत कुमारच्या घराची देखील झडती घेण्यात आली.











