राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव (सालु मालु ) येथील किशोर सोनवणे यांना गावातील काही गाव गुंडांनी लोखंडी फायटर ने मारहाण केली. दलित महिलांची छेडछाडही केली. ही घटना होऊनही पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केले नाही. या प्रकरणी आता दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीने गावगुंडावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केले आहे.
पारगाव येथील किशोर महादेव सोनवणे यांना गौरव राजेंद्र ताकवणे, अनिकेत खंडेराव ताकवणे, रमेश श्रीराम झांझुर्णे, आदेश सतिश ताकवणे या गावगुडांनी लोखंडी फायटरने जबर मारहाण केल्याची घटना 12 जुलै रोजी घडली होती. संबंधित आरोपींवर यवत पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
मात्र या घटनेला पाच दिवस उलटूनही पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केले नाही. या प्रकरणाची आता दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीने दखल घेतली. वंचित बहुजन आघाडीचे दौंड तालुका अध्यक्ष अ्श्विन वाघमारे, तालुका सचिव अजिंक्य गायकवाड, तालुका संघटक मयूर शिशुपाल, दौंड शहर उपाध्यक्ष टोनी भाई जगताप, शुभम वानखेडे, भीम क्रांती सेनेचे करण खांडे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पीडित सोनवणे कुटुंबांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.
संबंधित आरोपीही हे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचे बगल बच्चे असुन ते दलित वसाहतीच्या अवतीभवती महिलांची छेड काढण्यासाठी सतत ये – जा करत असतात, महिलांना धमकावले जाते, गावात राहू दिल जाणार नाही, पिडीत सोनवणे कुटुंबांना गुन्हा मागे दबाव आणला जात असुन धमकी दिली जात आहे. सध्या सोनवणे कुटुंब दहशतीखाली आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी आणि यवत पोलीसांनी या आरोपींना तातडीने अटक करावी, कोणाच्या राजकीय दबावाखाली आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा वंचित बहुजन आघाडीला आंदोलन करावे लागेल. असा इशारा वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे दिला आहे.











