राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्ता आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग वळणाऱ्या बारामती फाट्यावर रस्त्यालगत धोकादायक मोठा खड्डा तासाभरातच बुजून डागडुजी करण्यात आली. या संदर्भात महान्यूजने वृत्त प्रकाशित केले होते.
पुणे सोलापूर महामार्गावरून पालखी महामार्गाकडे वळताना महामार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तर सेवा रस्त्याच्या लगत भला मोठा धोकादायक खड्डा पडला आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे लोखंडी जाळी उभी केली होती. ठिकाणी मोठी जीवित हानी होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
यासंदर्भात महान्युज ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि टोल प्लाझा कंपनीचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत दौंड चे तहसीलदार अरुण शेलार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तात्काळ खड्डा बुजवण्याचे आदेश दिले. परिणामी बातमी प्रसिद्ध होताच अवघ्या तासाभराच्या आतच हा खड्डा बुजवण्यात आला.











