राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्ता आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग वळणाऱ्या बारामती फाट्यावर रस्त्यालगत भला मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा सध्या अपघाताला निमंत्रण देत आहे.
दरम्यान, पाटस टोल प्लाझा कंपनीचे संबंधित अधिकारी या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ज्या गावांमध्ये पालखी मुक्कामी असते, विसावा घेते, त्या गावांना शासनाने पालखी सोबत आलेल्या भावी भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये त्यांची दक्षता घ्यावी यासाठी शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करते.
मात्र अनेक ठिकाणी या निधीचा पूर्णपणे आणि व्यवस्थित उपयोग केला जात नसल्याचे चित्र आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथे ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात पालखी तब्बल दोन अडीच तास विसाव्यासाठी थांबते. त्यानंतर पालखी पुणे सोलापूर महामार्गावरून नव्याने झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरुन जाते. मात्र सध्या पुणे सोलापूर महामार्गावरून पालखी महामार्गाकडे वळताना महामार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सेवा रस्त्याच्या लगत भला मोठा खड्डा पडला आहे.
या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे लोखंडी जाळी उभी केली आहे. मात्र गर्दी लक्षात घेता या ठिकाणी जीवितहानी होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालखी सोहळ्यासोबत लाखो भाविकांच्या गर्दीने हा महामार्ग फुलून गेलेला असतो. परिणामी, या ठिकाणी पालखीसोबत येणाऱ्या भाविकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि ५) पाटसला येणार आहे. अवघ्या तीन दिवसांचा अवधी राहिला असतानाही पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व टोल वसुली कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याठिकाणी अपघात किंवा जीवीत हानी सारखी दुर्घटना घडल्यास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि टोल प्लाजा कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे.











