दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यात घराची भिंत कोसळून एक महिलेचा ढिकाऱ्याखाली दबल्याने मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. वाई तालुक्यातील कवठे या गावी घराची भिंत ढासळून हा प्रकार घडला.
कवठे (ता वाई) येथील शंकरराव पोळ पाटील यांच्या जुन्या घराची पाठीमागील मातीची भिंत कोसळल्याने या घराच्या पाठीमागील घरात राहत असलेल्या रेश्मा रुपेश पोळ (वय 40) व रूपाली प्रशांत पोळ (वय 32) यांच्यावर भिंतीच्या मातीचा भाग पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर रेश्मा रुपेश पोळ या मातीच्या ढीगाराखाली गाडल्या गेल्या.
परिसरातील ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने या ठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेऊन दोघींनाही मातीच्या ढीगा-यातुन बाहेर काढले. उपचारासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे येथे दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी रेश्मा पोळ यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, तसेच रूपाली पोळ यांना दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.











