पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील एरंडवणे हा भाग झिका रुग्णांचे संसर्गाचे केंद्र बनू लागले आहे अगोदर दोन रुग्ण सापडलेल्या या भागात आता एका गर्भवती महिलेला देखील संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून पुण्यातील झिका रुग्णांची संख्या आता पाच वर पोहोचली आहे. दरम्यान महानगरपालिकेने मुंढवा व एरंडवणे परिसरातील 20 जणांचे रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.
पुण्यातील एरंडवणे परिसरातच यापूर्वीच डॉक्टर व त्याच्या मुलीला झिका तापाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता याच भागात गर्भवती महिलेला देखील झिकाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही महिला एरंडवणे परिसराच्या गणेशनगर परिसरातील असल्याने या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. गणेशनगर, खिलारवाडी या परिसरातील चार हजारहून अधिक रुग्णांचे सर्वेक्षण यामध्ये करण्यात आले आहे.
दरम्यान पुणे शहरातील मुंढवा भागातही एका मायलेकीला तापाची लागण झाली. त्याची तपासणी केल्यानंतर या दोघींनाही झिका आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता एरंडवणे भागात आढळलेल्या गर्भवती महिलेची प्रकृती स्थिर असून महापालिकेने रुग्णांचे रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.











