सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एकत्र लढवल्यानंतर आता महायुतीमध्ये इंदापूरात पहिली वादाची ठिणगी पडली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेच उमेदवार म्हणून स्पष्ट करत इंदापूर तालुका भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना प्रचाराला लागा अशा सुचना भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. यामुळे इंदापूर मध्ये महायुतीत डोकेदुखी वाढणार आहे.
भाजप युवा मोर्चार्चे युवक अध्यक्ष तुषार खराडे यांनी इंदापूर भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यामध्ये कार्यकर्त्यांकडून तालुक्याच्या कामाचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यानंतर तुषार खराडे यांनी पत्रकार परिषद घेत 2024 चे इंदापूरचे विधानसभेचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील हेच असणार असे म्हणत प्रचाराला सुरुवात केली असल्याचे स्पष्ट केले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्ह्याच्या भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे तसेच भाजप युवा मोर्चाचे राजवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बैठक घेतलेली आहे व हर्षवर्धन पाटील हेच उमेदवार असतील असे ठरले असल्याचे घोषित केले.
इंदापूर विधानसभेला महायुतीचे तिकीट कोणाला भेटणार यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजपमध्ये सामना रंगणार आहे. अजित पवार व देवेंद्र फडणवीस सांगतील तोच उमेदवार ठरणार असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे व माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले आहे. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी युतीच्या उमेदवाराबाबतीत नियोजनबद्ध केलेला प्रचाराचा प्रयत्न व तालुक्यातील हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा उमेदवारीचा आग्रह केला आहे.
इंदापूर तालुका भाजपने आता हर्षवर्धन पाटील यांचे नाव इंदापूर विधानसभेला पुढे केल्याने महायुती मध्ये बिघाडी होवू शकते. भाजपा युवा मोर्चा युवा तालुकाध्यक्ष तुषार खराडे यांचे विधान तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचे स्पष्ट केल्याने वरिष्ठ नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











