बारामती : महान्यूज लाईव्ह
प्रत्येक वेळी कारवाई केली, म्हणजेच गुन्हे कमी होतात असं नाही, अनेक वेळा तुमच्या कार्यवाहीमध्ये सकारात्मकता आणि मानसिक इच्छाशक्ती चांगली असेल, तर बरेच सकारात्मक बदल घडून येतात. बारामतीत याची सुरुवात या निमित्ताने झाली आहे. निमित्त होतं चक्क पोलिसांनीच दुचाकी पकडून त्यांना बसवल्या गेलेल्या नव्या नंबरप्लेटचं!
अनेक वेळा दुचाकी पकडल्या.. चार चार वेळा दंडही मारला.. कारवाई केली.. गडी काही सुधारेनात.. पण त्यांना सुधरवण्याचा चंग बांधलेल्या बारामती वाहतूक पोलीस शाखेनेही हार मानली नाही.. चार चार वेळा कारवाई करूनही अनेक महाभाग आपल्या वाहनावरील फॅन्सी क्रमांक बदलत नाहीत, तुटलेल्या, पुसट झालेल्या नंबरप्लेट बदलत नाहीत हे पाहून अशा गाड्या पकडून पोलिसांनीच या नंबर प्लेट बदलण्याची मोहीम आखली. राज्यातील या आगळ्यावेगळ्या मोहिमेची सुरुवात बारामतीत झाली.
बारामतीतील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने तब्बल 64 वाहनावर अशा नंबर प्लेट लावल्यास सवलतीच्या दरात थेट नंबरप्लेट बसवण्याचा हा बहुदा राज्यातील एकमेव प्रयोग असावा. बारामतीत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या या अनोख्या फंड्यामुळे तब्बल ६४ वाहनांवर आता नंबरप्लेट लागल्या आहेत.
पोलिसांनी जिथे अशा विना नंबरच्या गाड्या कारवाईत सापडतील त्यांच्यावर नंबर प्लेट टाकण्यासाठी व बसवून देण्यासाठी २५ जून रोजी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत ही मोहीम राबवली. या मोहिमेत संबंधित वाहने बाजूला घेऊन नंबरप्लेट बनविणाऱ्यांना लगेच उपलब्ध करून वाहनांवर नंबरप्लेट बसवण्यात आल्या.
अनेक टवाळखोर तरुणांकडून वाहनांवर फॅन्सी नंबर लावण्यात येतात, वाहनांच्या क्रमांकात छेडछाड करून फायनान्स किंवा अन्य प्रकारातून वाचण्यासाठी खोटे नंबर टाकले जातात, काही चालकांकडे वाहन चालक परवाना नसतो, काही वाहनांना मुद्दाम नंबर टाकले जात नाहीत, तर काही वाहने गुन्ह्यासाठी वापरलेली असतात. अशावेळी वाहनांचे नंबर ब्लँक केले जातात. त्यामुळे अवघड गुन्ह्याचे तपास लावताना पोलिसांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र दंड न करता विना क्रमांकाच्या वाहनांवर अशाप्रकारे केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वाहतूक पोलीस अंमलदार प्रशांत चव्हाण, अशोक झगडे, प्रदीप काळे, सुधाकर जाधव, सचिन वाघ, योगेश कांबळे, रुपाली जमदाडे, स्वाती काजळे, सीमा साबळे, सीमा घुले, माया निगडे, वनिता कदम तसेच बऱ्हाणपूर उपमुख्यालय येथील महिला पोलिस अंमलदार जागृती मचींदर, दिपाली वडवकर, अर्शीन शेख, स्मिता गायकवाड, शीतल कोकरे, मयुरी शिरसाट, गोदावरी केंद्रे, शुभांगी रुपणवर, मनीषा इंगळे, शीतल नन्नवरे, सारिका शितोळे, रेणुका साळवे यांनी केली.











