मुंबई : महान्यूज लाईव्ह
पुण्यामध्ये एकापाठोपाठ एक विचित्र घटना घडत आहेत. काल एका हॉटेल समोर ड्रग्स घेणाऱ्या युवकांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर एका मॉलमध्ये तरुणी ड्रग्स घेताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि साऱ्या राज्यात खळबळ उडाली.
यादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र गृहमंत्रालयापेक्षा पालकमंत्री अजित पवार यांच्यावरच अप्रत्यक्ष शरसंधान केले. मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्याच नाहीत असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यांच्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली, मात्र कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आरसाच दाखवला.
रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट करत चंद्रकांत पाटील यांना त्यांचीच माहिती पुरवली आहे यामध्ये रोहित पवार त्यांनी नमूद केले की, पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही, असे सांगणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांनी हे लक्षात घ्यायला हवं की, तुम्ही पालकमंत्री असताना जानेवारी ते मे २०२३ या अवघ्या पाच महिन्यात राज्यात तब्बल ७ हजार कोटींचे ड्रग्स सापडले आणि विशेष म्हणजे त्यात देशात कुठंही उपलब्ध न होणाऱ्या कॅथा इडूलीस या ड्रग्सचाही समावेश आहे. आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात अमली पदार्थांच्या व्यापाराची पुण्यात जी पेरणी झाली त्याचंच पीक आज बहरत असून सांस्कृतिक पुणे हे पूर्णपणे उडते पुणे झाले आहे.
त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली नमूद केले आहे की, पुणे शहरात दररोज कोट्यवधींचा अमली पदार्थांचा व्यापार होत असताना राज्याचे गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का? अधिवेशनात गृहमंत्र्यांना लक्षवेधीच्या माध्यमातून मी पुण्यातील वाढत्या ड्रग्सचा मुद्दा समोर आणला होता, पण तेंव्हा फडणवीस साहेबांनी गोलगोल उत्तरं देऊन टाळाटाळ केली होती.
सुपरफास्ट देवाभाऊ किमान संवेदनशील विषयांवर तरी serious व्हा… आजी-माजी पालकमंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब सर्वांना विनंती आहे. पक्षविस्तारासाठी गुंडांना संरक्षण देणं थांबवा.. अन्यथा या सांस्कृतिक शहरासह हा महाराष्ट्र भकास व्हायला वेळ लागणार नाही असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.











