बारामती : महान्यूज लाईव्ह
घटना आहे, बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर बस स्थानकाशेजारची.. या बस स्थानकाच्या शेजारी म्हणे एकदम खेटून अनधिकृतपणे उभारलेला चेतना फूड कॉर्नर नावाचा चारचाकी गाडीत केलेला फिरता स्टॉल आहे.. या स्टॉलच्या झापडीला खेटून बस चालक शांताराम माणिकराव जगताप यांनी बस नेली, यामध्ये या बसचा धक्का स्टॉलच्या झापडीला लागला आणि स्टॉलवरती खाद्यपदार्थ तळण्याचे काम करणाऱ्या आचाऱ्याच्या अंगावर गरम तेल सांडले.
हे तेल अंगावर पडल्याने आचारी भाजला गेला. या स्वयंपाक्यास बस चालक शांताराम जगताप उपचारासाठी घेऊन जात असताना, कैलास प्रभाकर शेलार व श्रीकांत कैलास शेलार हे दोघेजण आले. अंगावर धावून तुला बस नीट चालवता येत नाही का? असे म्हणत त्यांनी या बस चालकास शिवीगाळ केली व हाताने लाथाबुक्क्यांनी व प्लॅस्टिकच्या खुर्चीने मारहाण केली.
यावरून शांताराम जगताप यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी श्रीकांत शेलार व कैलास शेलार या दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.











