नगर : महान्यूज लाईव्ह
नवरा मरुन एक वर्षही झालं नाही, तिचं लफडं बाहेर आलं. गाव काही बोलत नव्हतं, पण अचानक भरीस भर म्हणून अचानक दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. हा अपघाती मृत्यू पोलिसांनी नोंद देखील केला, पण गावकऱ्यांना मात्र वेगळ्याच गोष्टीचा वास आला. गावकऱ्यांना चक्क रास्ता रोको करावा लागला आणि मग जो तपास झाला, त्याने अहमदनगर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.
ही घटना आहे, नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या गावची. नवऱ्याच्या संपत्तीत आणि प्रेमात अडसर नको म्हणून स्वतःच्याच पोटची दोन चिमुकली बाळ शेततळ्यात ढकलणारी नराधम वैरीण आईच निघाली. 17 एप्रिल रोजी हिवरगाव पावसा येथील एका शेततळ्यात बुडून रितेश गंगाधर सारंगधर पावसे हा बारा वर्षे मुलगा व त्याचा भाऊ प्रणव सारंगधर पावसे वय वर्षे 8 या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत होती. कारण एक वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचा म्हणजे सारंगधर पावसे यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेची पोलिसांनी घातपाताची अपघाताची नोंद देखील केली. परंतु गावात मात्र चर्चा वेगळी सुरू झाली. रितेश व प्रणव या दोघांची आई कविता हिच्याबद्दल गावकऱ्यांचे मत थोडेसे वेगळे झाले होते.
तिचे गावातीलच सचिन बाबाजी गाडे त्याच्याशी अनैतिक संबंध होते. सचिन गाडेला कविता बरोबर विवाह करायचा होता. पण सारंगधर पावसे यांच्या शेत जमिनीला ही दोन्हीही मुले वारसदार होती. जमिनीच्या नोंदीच्या प्रकरणात या दोघांनाही समाविष्ट करावे लागेल, त्यापेक्षा काटा काढलेला बरा म्हणून दोघांनाही शेततळ्यात ढकलण्यात आले असावे असा संशय सारंगधर पावसे यांचे कुटुंबीय व नातेवाईक व्यक्त करत होते.
कविता हिच्या वागण्यातील बदलही गावकऱ्यांनी टिपला आणि हा घातपाताचा प्रकार असावा अशी चर्चा सुरू झाली, मात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊनही यात काहीच बदल होत नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी 29 मे रोजी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला आणि त्यानंतर मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये दखल घेत नव्याने तपास केला आणि या तपासात मात्र कविता आणि सचिन गाडे हे दोघेही या घटनेतील खुनी आणि सूत्रधार आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली.











