बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील माळेगाव येथे 31 मे 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रविराज तावरे लाखे यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणाचा तपासही झाला होता, मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान हा संपूर्ण तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले असून, हा तपास सीआयडीच्या पोलीस अधीक्षक अथवा आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यानेच करावा असाही आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या संदर्भातील मागणी रविराज तावरे व माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांच्या वतीने करण्यात आली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ए. एस. गडकरी व श्याम सी. चांडक यांच्या खंडपीठाने या संदर्भात 11 जून 2024 रोजी नव्याने आदेश दिले आहेत. या आदेशाने माळेगावात खळबळ उडाली आहे. यापूर्वी या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर काही संशयीतांना वगळावे यासाठी कलम 169 नुसार रिपोर्ट दाखल करण्यात आला होता, याला तावरे यांनी आव्हान दिले आणि आता उच्च न्यायालयाने तावरे यांचे म्हणणे ग्राह्य धरत नव्याने तपासाचे आदेश दिले आहेत.











