मुंबई : महान्यूज लाईव्ह
बँक खात्यात ग्राहकाला झालेली ऑनलाइन फसवणूक ही कोणत्याही परिस्थितीत खातेदाराला जबाबदार ठरवता येऊ शकणार नाही. ही फसवणूक जरी बँक किंवा ग्राहकामुळे होत नसली, तरी यंत्रणेतील त्रुटीमुळे होत असल्याने बँकेने याची भरपाई द्यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बँक ऑफ बडोदाला दिला. एका प्रकरणांमध्ये बँक ऑफ बडोदा ला सहा आठवड्याच्या आत खातेदारकास 76 लाखांची रक्कम परत करावी असा आदेश दिला आहे.
हा फार मोठा दिलासा बँक खातेदारांसाठी असून त्याचे दुरगामी परिणाम होणार आहेत. अनेक ठिकाणी बँक ग्राहकाची झालेली फसवणूक बँका अंगावर घेत नाहीत. त्या खातेदाराला उलट पावली पाठवून देतात व कोणतीही जबाबदारी घेत नाहीत, अशा बँकांसाठी हा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे.
घटना दोन वर्षांपूर्वीची आहे त्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती फिरदोश पुणेवाला यांच्या खंडपीठाने आता दिला आहे. ही घटना एक ऑक्टोबर 2022 रोजी घडली होती. बँक ऑफ बडोदा च्या ग्राहक असलेल्या फार्मा सर्च आयुर्वेदिक कंपनीचे जयप्रकाश कुलकर्णी यांच्या बँक खात्यातून कोणताही ओटीपी न येता अचानक आयुर्वेदिक कंपनीशी काही त्रयस्थ व्यक्ती व संस्था लाभार्थी म्हणून जोडले गेले आणि या त्रयस्थ व्यक्तींच्या खात्यात 76 लाख रुपये हस्तांतरित झाले होते.
यासंदर्भात कुलकर्णी यांनी बँक लोकपाल व बँकेकडे पाठपुरावा केला होता. मात्र बँकेने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. तसेच बँक लोकपालने अपेक्षित कार्यवाही केली नाही, म्हणून कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कुलकर्णी यांचे म्हणणे ग्राह्य धरून बँक ऑफ बडोदा ला सहा आठवड्याच्या आत 76 लाख रुपयांची रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.
यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय रिझर्व बँकेच्या परिपत्रकाचा वादी कंपनीने घेतलेला आधार ग्राह्य धरला. भारतीय रिझर्व्ह बँकेने सन 2000 मध्ये एक परिपत्रक काढले असून त्यामध्ये एखाद्या त्रयस्थ किंवा तिसऱ्याच व्यक्ती अथवा संस्थेने कायद्याचे उल्लंघन केल्यास एखादा अनधिकृत व्यवहार झाला, तर त्याकरता ग्राहकाला जबाबदार धरण्यात येणार नाही अशा स्वरूपाचा या परिपत्रकाचा मसुदा होता. न्यायालयाने याचा आधार तर घेतलाच शिवाय बँकेचे ग्राहक संरक्षण धोरण एखाद्या अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहार सारखेच असल्याचे देखील नमूद केले आहे.











