राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत काही रासायनिक कंपन्या पावसाच्या पाण्यात दूषित रासायनिक मिश्रित सांडपाणी सोडत आहेत. पावसाळा आला की, या कंपन्या रासायनिक मिश्रीत दूषित सांडपाणी सोडण्याची संधीच जणू काय त्यांना चालून येते.
दरवर्षी पावसाळ्यात या कंपन्या हे दूषित रसायनमिश्रित सांडपाणी उघड्यावर सोडत आहेत. दरम्यान, या कंपन्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे या भागातील स्थानिक नागरिक सातत्याने तक्रारी करत आहेत. मात्र त्यांना वेळोवेळी संबंधित कंपनीकडून हप्ते वसुली पोहचत असल्याने त्यांचा या कंपन्यांना एक प्रकारे वरदहस्तच आहे. असा आरोप या भागातील स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
मागील तीन-चार दिवसांपासून दौंड तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने सुरुवात केली आहे. सध्या तालुक्यात बहुतांश गावांमध्ये हा पाऊस पडत आहे. तालुक्यातील पाटस, गिरीम, कुरकुंभ परिसरातही पाऊस पडत आहे. या पावसाचा फायदा घेत कुरकुंभ औद्योगिक विभागातील काही ठराविक कंपन्या या पावसाच्या पाण्यात दूषित रासायनिक मिश्रित सांडपाणी उघड्यावर सोडून देत आहेत.
परिणामी हे दूषित सांडपाणी डोंगरदऱ्यातून गिरीम आणि पाटस हद्दीत येते. कंपन्या लगतच गिरीम व पाटस हद्दीत वन विभागाचे क्षेत्र आहे. त्यालगतच वन विभागाचे खासगी वाटप क्षेत्र आहे . या क्षेत्रातील पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये हे रासायनिक मिश्रित दूषित सांडपाणी उतरत आहेत. त्यामुळे विहीर आणि बोअरवेलमधील पाणीसाठा हा दूषित झाल्याने रासायनिक पाण्याचा फेस तयार झाला आहे.
तसेच कंपन्यालगत वन विभागाच्या हद्दीत हे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर सोडल्याने या भागातील वन्य प्राणी यांच्या आरोग्यला आणि जीवितला धोका निर्माण झाला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी या कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे मेंढपाळाच्या शेळ्या मेंढ्या हे दूषित पाणी पिल्याने दगावल्याची घटना घडली होती. मात्र या प्रकाराकडे महाराष्ट्र प्रदूषण विभाग आणि दौंड वन विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे.
तक्रार आली की संबंधित कंपनीला केवळ फार्स म्हणून नोटीस बजावयची आणि आम्ही कारवाई करत आहे असा दिखावा करायचा आणि नंतर संबंधित कंपनीकडून आर्थिक मलई घेऊन या कंपन्यांना कारवाई मधून सूट द्यायची असे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. अशी चर्चा गिरीम, कुरकुंभ आणि पाटस परिसरात आहे. पावसाच्या पाण्यात दूषित रासायनिक मिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या आणि नागरिकांची आरोग्याशी आणि जीवाशी खेळणाऱ्या या कंपन्यावर ठोस कायदेशीर कारवाई कधी होणार? हा प्रश्न सध्या उपस्थित होत असून त्यात दूषित सांडपाण्यामुळे मोठी जीवित हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.











