घटना शुक्रवारची आहे, शुक्रवारी सकाळी घरातून दोन सख्ख्या बहिणी अचानक बेपता झाल्या. त्यांना शोधण्यासाठी नातेवाईकांची धावाधाव झाली. पण काही वेळातच तपास लागला आणि सारेच विषण्ण झाले. या दोघींनी घरापासून काही अंतरावरच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती.
उत्तर प्रदेशच्या चित्रकोट जिल्ह्यातील राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नादीन कुर्मीयान या गावात ही घटना घडली. घटना जरी उत्तर प्रदेशातील असली, तरी आपले वडील आपल्यावर कशासाठी रागावतात, याचाही विचार आजकालची मुलं करत नाहीत, या चिंतेने साऱ्याच पालकांना विचार करायला लावणारी ही घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानसिंह नावाच्या व्यक्तीच्या कुटुंबातील त्यांच्या मुली सोमवती आणि अनामिका शुक्रवारी अचानक घरातून बेपत्ता झाल्या. 22 वर्षीय सोमवती आणि 18 वर्षांची अनामिका एकाच वेळी बेपत्ता झाल्याने घरच्या साऱ्यांच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. घरच्यांनी लागलीच शोध घेण्यास सुरुवात केली. दिवसभर मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत दोघींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले.
घरगुती कारणावरून दोघींना त्यांचे वडील ज्ञानसिंह रागावले. या कारणावरून दोघींनी एकाच वेळी विचार केला असावा आणि घर सोडले असावे असे परिसरात बोलले जात आहे. मात्र या घटनेने संपूर्ण चित्रकूट जिल्ह्यात खळबळ उडाली. घटनेच्या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक चक्रपाणी त्रिपाठी व राजापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निष्ठा उपाध्याय यांनी भेट दिली. या घटनेमागे इतर काही कारण आहे का तेही शोधले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.











