मुंबई : महान्यूज लाईव्ह
लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल 96 सभा घेतल्यानंतर 84 वर्षीय शरद पवार यांनी मतमोजणीच्या आधी एक दिवस दुष्काळावरून राज्य सरकारला छेडले आहे. लोकसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी दुष्काळाबाबत राज्य सरकार कुठलीच भूमिका घेत नसल्याने नाराजी व्यक्त केली. ही परिस्थिती बदलली नाही, तर मला संघर्ष करावा लागेल असा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांना पत्र लिहित शरद पवारांनी हा इशारा दिला आहे या संदर्भात शरद पवारांनी मागील वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीची पार्श्वभूमी देखील सरकारच्या नजरेस आणली आहे. या पत्रामध्ये शरद पवार यांनी नमूद केले आहे की, 24 मे रोजी आपण राज्य शासनाचे गंभीर दुष्काळाकडे लक्ष वेधले मात्र मी राज्य सरकारची सहकार्य करण्याची व दुष्काळी परिस्थितीला एकत्र जाण्याची तयारी दाखवत असतानाही सरकारने मात्र काहीच केलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला, मात्र या बैठकीला मंत्री गैरहजर होते. यावरून राज्य सरकार अंग झटकून कामाला लागले असे दिसत नाही.
मागील वर्षी राज्यामध्ये 1100 टँकर होते, ती संख्या आता 11000 वर पोचली आहे. उजनी, जायकवाडी सारखी महत्त्वाची धरणे पूर्ण आटली आहेत. संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवाडयासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी ह्या तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.
पाण्याअभावी बिकट परिस्थिती बनलेल्या फळबागा वाचवण्यासाठी शासनाने अद्याप काहीच प्रयत्न केलेले नाहीत. सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत. हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते. दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भुमिका घेत आलो आहे. परंतू या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणे कठीण झाले आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे मी आवाहन करतो. मात्र त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भुमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे नमूद करतो असे पवार यांनी नमूद केले आहे.











