पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील पोरशे कार हिट अँड रन प्रकरणात दोन दिवसापासून जिची चर्चा होती, ती वेदांत अग्रवाल ची आई शिवानी अग्रवाल हिला अखेर पोलिसांनी अटक केली. शिवानी अग्रवालला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिला बालसुधारगृहात नेले असून, त्या ठिकाणी रक्तगट तपासणी बरोबरच या प्रकरणातील खरा रक्ताचा नमुना देखील समोर येण्याची चिन्हे आहेत.
डॉक्टर अजय तावरे व श्रीहरी हरणोळ यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी ससून रुग्णालयातील शिपाई अमित घट कांबळे याला देखील अटक केली होती. या सर्व प्रकरणांमध्ये मुळात रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून दिले हा मुद्दा वेगळीकडेच राहिला, परंतु जो रक्ताचा नमुना दिला तो शिवानी अग्रवालचा असावा अशी शंका पोलिसांना एकूण या प्रकरणातील आतापर्यंतच्या तपासातून आली. त्यामुळे पोलीस शिवानी अग्रवाल पर्यंत पोहोचले. दोन दिवसापासून शिवानी अग्रवाल चा तपास पोलीस करत होते. आज अखेर शिवानी अग्रवाल ला ताब्यात घेऊन तिला अटक केले.
आतापर्यंत या प्रकरणात अल्पवयीन मुलगा, त्याचा बाप विशाल अग्रवाल, त्याचा बाप सुरेंद्र अग्रवाल यांना सुरुवातीच्या काळात अटक झाली. त्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यापुढील तपासात ससूनपर्यंत पोलीस पोचले आणि ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय तावरे व श्रीहरी हरणोळ यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या दोघांना तीन लाख रुपये घेऊन येणारा ससून मधील शिपाई अमित घटकांबळे याला अटक करण्यात आली.
यानंतर प्रकरण राष्ट्रवादीच्या आमदारापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर पोलीस जेव्हा अपघाता वेळी गाडीत बसलेल्या इतर दोन अल्पवयीन मुलांपर्यंत पोहोचले, तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. विशाल अग्रवाल चा मुलगा हा दारू पिलेला होता हे तर जबाबात समजलेच, पण त्या पलीकडे जाऊन आणखी एक माहिती उघड झाली, ती म्हणजे 19 मे रोजी वेदांत अग्रवालचा रक्ताचा नमुना तपासताना त्याची आई शिवानी अग्रवाल ही ससूनमध्ये होती व तिने डॉक्टरांवर दबाव आणला.
अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस जास्त सतर्क झाले आणि त्यांनी शिवानी अग्रवालच्या दिशेने तपास सुरू केला. कालपर्यंत शिवानी अग्रवाल चा शोध पोलीस घेत होते आज अखेर तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिला अटक करण्यात आली. शिवानी अग्रवालच्या रक्ताच्या तपासणीनंतर आता या प्रकरणात आणखी ट्विस्ट येणार असून ज्या आमदाराची गेल्या अनेक दिवसापासून फक्त चर्चा सुरू आहे, त्या आमदारापर्यंत पोलीस कानून के हात लंबे होते है चा संदेश पोहोचवतील अशी आशा आहे.











