घटना अर्थातच महाराष्ट्रातील नाही, पण अंगावर शहरा आणणारी आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील बोधल कचार या गावात बुधवारच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एक घटना घडली. ज्याने मध्यप्रदेशातील अनेक कुटुंबे हादरुन गेली. आदिवासी कुटुंबातील या घटनेने पोलिसांच्या अंगावर शहारा आला.
या गावातील 27 वर्षीय दिनेश पटेलचे कुटुंबीयांनी आठवड्यापूर्वीच लग्न लावून दिले. 21 मे रोजी लग्न झाल्यानंतर त्याने गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास नवविवाहित पत्नी वर्षा, मोठा भाऊ श्रावण, त्याची पत्नी, आई सियाबाई, लहान बहीण आणि श्रावणच्या तीन मुलांना कुऱ्हाडीने वार करून संपवले.
घराच्या अंगणात झोपलेल्या या सर्वांनाच त्यांनी मारून टाकल्याने संपूर्ण गावात दहशतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान आठ जणांना मारल्यानंतर तो बहिणीच्या नातवावरही हल्ला करत होता, परंतु नातवाने पळ काढून जीव वाचवला, मात्र त्यात तो किरकोळ जखमी झाला. दरम्यान बहिणीने आरडाओरडा केल्याने दिनेश पटेल तिथून पळाला आणि काही अंतरावर त्याने पुन्हा गळफास घेऊन स्वतःचेही जीवन संपवले.
दरम्यान या घटनेनंतर सकाळपासून माहुल झिर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस घटनास्थळी पोचले असून संपूर्ण गावात संचारबंदी करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार दिनेश पटेल हा मानसिक दृष्ट्या आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू होते.











