गुजरात मधील राजकोट शहरानजीकच्या टीआरपी गेमिंग झोन मध्ये आग लागून तब्बल 32 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये बाराहून अधिक लहान बालकांचा देखील समावेश आहे. या घटनेनंतर आता वेगवेगळे किस्से समोर येत आहेत. गेम खेळण्यापूर्वी या गेमिंग झोन प्रशासनाकडून गेम खेळण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून पहिल्यांदाच एक अटी व शर्तींचा अर्ज लिहून घेतला जात होता, ज्याच्यामध्ये लिहून घेतलं जात होतं की, ग्राहकाला काहीही झालं तरी गेमिंग झोन जबाबदार राहणार नाही!
घटना घडल्यानंतर गुजरातच्या उच्च न्यायालयाने स्वतः यामध्ये दखल घेतली व त्यानंतर टीआरपी गेमिंग झोन चा मालक विक्रमसिंह सोलंकी आणि त्याचा व्यवस्थापक याच्यासह सहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विरेन वैष्णव आणि न्यायमूर्ती देवेन देसाई यांच्या विशेष खंडपीठाने ही घटना मानवनिर्मित असल्याचा ठपका ठेवला.
न्यायालयाने सांगितलं की, गेमिंग झोन बनवण्यासाठी आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी सुयोग्य नियमांचा वापर केलेला नाही. ज्या कायद्यानुसार गेमिंग झोनला चालवण्यासाठी परवानगी दिली गेली त्याची माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान या गेमिंग झोन मध्ये प्रवेश केल्यानंतर एक फॉर्म भरून घेतला जात होता.
ज्याच्यामध्ये असं लिहिलं गेलं होतं की, मी सर्व प्रकारच्या धोक्यांची व त्याच्या परिणामावरून होणाऱ्या कोणत्याही गंभीर शारीरिक जखमा अथवा मृत्यू किंवा संपत्तीचे नुकसान यापैकी कोणत्याही गोष्टींची स्वतः जबाबदारी घेत असून त्या प्रत्येक धोक्याची जबाबदारी स्वीकारत आहे. ज्याच्यामध्ये मृत्यू देखील समाविष्ट आहे. आणि या मजकुराच्या खाली संबंधित ग्राहकाची स्वाक्षरी घेतली जात होती. आता हा फॉर्म देखील अडचणीत सापडलेला आहे.











