नाशिक : महान्यूज लाईव्ह
नांदेडमध्ये 13 मे रोजी 170 कोटींच्या मालमत्तेवर जप्ती केल्यानंतर आयकर विभागाने काल नाशिक मध्ये धाड टाकली सुराणा ज्वेलर्स या सराफा व्यवसायिकावर केलेल्या छापेमारीत आयकर विभागाने तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. तब्बल 90 कोटींच्या मालमत्तेचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. एकूणच या छाप्यात 500 कोटींचे घबाड आयकर खात्याच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान रोख 26 कोटी मोजायला 14 तास लागले.
आयकर विभागाने नाशिक मध्ये टाकलेली ही धाड सर्वात मोठी असून तब्बल 55 अधिकारी सात वाहनातून आले होते. नाशिक, नागपूर आणि जळगावच्या आयकर विभागातील अधिकाऱ्यांचे एकत्रित पथक सुराणा ज्वेलर्स वर धाड टाकण्यासाठी गेले. तिथे तब्बल 26 कोटींची रोख रक्कम या पथकाने जप्त केली. ही रक्कम मोजण्यासाठी 14 तास लागले आणि त्यासाठी सात वाहने बोलवावी लागली. विशेष म्हणजे फर्निचर फोडून ही 26 कोटींची रोख रक्कम काढल्याचे सांगितले जाते.
या वाहनांमधून ही रक्कम नेण्यात आली. सुराणा ज्वेलर्स या पेढीवर तब्बल 30 तास आयकर विभागाची ही कारवाई सुरू होती. सुराणा ज्वेलर्सच्याच रियल इस्टेट व्यवसायावरही एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. आयकर विभागाने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेली सुराणा ज्वेलर्सची कार्यालय रियल इस्टेट ची कार्यालये, निवासस्थान, बंगले, मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी देखील ही छापेमारी एकाच वेळी करण्यात आली.











