गुजरातच्या राजकोट शहरातील कलावद रस्त्यावर असलेल्या प्रसिद्ध टीआरपी गेम झोन मध्ये शनिवारी लागलेली आग संपूर्ण भारतात धक्का देणारी ठरली. या झोनचे काम सुरू असल्याने फक्त एका दिवसासाठी हा गेम झोन उघडला आणि तब्बल 27 जणांचा जीव गेला. अनेक जणांची अक्षरशः राखरांगोळी झाली. आता डीएनएच्या आधारे ओळख पटवण्याचे काम केले जाणार आहे.
शनिवारी दुपारी ही आग लागली. अचानक लागलेल्या या आगीने सारा परिसर वेढून गेला. या आगीचे लोट तीन किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होते. यामध्ये 25 जणांची सुटका करण्यात आली, मात्र संपूर्ण गेम झोन जळून खाक झाला. बारा लहान मुलांसह 24 जणांचा मृत्यू झाला. ही संख्या वाढू शकते असं प्रशासनाचे म्हणणं असून, यामध्ये मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेने संपूर्ण भारतात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने याला लागलेली आग विझवण्यात अडथळे येत आहेत.
शनिवारी दुपारी या टीआरपी मॉललाच आग लागली. या गेम झोन मध्ये काही कामे सुरू होते. दुरुस्ती आणि नूतनीकरणाची कामे सुरू होती. त्या ठिकाणी लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणावर होते. दोन दिवसापर्यंत हे गेम झोन बंद होते. मात्र काल एका दिवसासाठीच हे सुरू करण्यात आले आणि शॉर्टसर्किटमुळे आग लागली.
ही आग एवढ्या प्रचंड भडकली की, लोकांना बाहेर पडण्यासही उसंत मिळाली नाही. या मॉल चा मालक युवराज सिंह सोलंकी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही या ठिकाणी भेट देत घटनास्थळाची पाहणी केली.











