ज्ञानेश्वर रायते, बारामती
आमची तपासाची भूमिका योग्य असं सुरुवातीला म्हणणारा पोलीस आयुक्त जेव्हा आमच्या पोलिसांकडून निष्काळजीपणा झाला इथपर्यंत पोचतो, तेव्हा हा प्रवास काही साधा सोपा नसतो. खरंतर पुण्याच्या या घटनेत जागरूक पुणेकरांनी कायद्याच्या रक्षकांनी त्यांनी सोडलेली चाकोरी बदलायला लावून त्यांची कायद्याची जागा दाखवून दिली. जर पोलिसांचा तपास योग्य होता तर दोन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा निलंबन का केलं?
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंदेकर यांनी या प्रकरणात जी भूमिका ठामपणे घेतली आणि त्याच्या पाठीशी पुणेकर ठामपणे उभे राहिले. त्याचा परिणाम पोर्शे हिट अँड रन प्रकरणात दिसतो आहे. अकेला धंगेकर क्या करेगा? अशा मस्तीत अग्रवाल फॅमिली होती, कारण अग्रवाल फॅमिलीच्या पाठीमागे आणखी एक आमदार होता. आणि मोजक्या पण भ्रष्ट पोलिसांची कुमकही होती. पण कायदा असा राबवला आणि पोलिसांची इच्छाशक्तीच असेल तर नेमकं काय घडू शकतं हे पोलिसांना बळजबरी करायला लावून दाखवून देणारा हा आमदार भलताच खमक्या निघाला.
आमदार धंगेकरांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तालयाची अब्रूची लक्तरे पुण्याच्या वेशीवर टांगली. काल परवा तर आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यांचे थेट नाव सांगत एका पबमध्ये एका महिलेसोबत असताना त्याचा फोटो दाखवून हा पब मधील पैसे गोळा करतो असा आरोप करत पुण्यात चांगलाच धमाका केला. असा पोलीस आयुक्तच नको अशी ठाम भूमिका घेणाऱ्या रवींद्र धंगेकरांचे अभिनंदन!
सुरुवातीला पंधरा तासात जामीन मिळणारा वेदांत अग्रवाल मग बाल सुधार गृहात कसा गेला? त्याचा बाप अटकेत कसा गेला? त्यालाही लवकर जामीन मिळणार नाही अशी व्यवस्था का केली गेली? त्याचाही बाप सुरेंद्र अग्रवाल त्याला अटक का झाली? ज्या पद्धतीने एवढं सगळं रामायण घडल्यानंतर पुण्याचे पोलीस जागे झाले आणि त्यांनी ज्या तर्फेने नंतरच्या काळात ही कारवाई केली हीच कारवाई पहिल्याच क्षणापासून व्हायला हवी होती.
याचा अर्थच असा आहे की या पुढील काळात प्रत्येक घटनेसाठी लोकांना क्रांती करावी लागेल. कारण जळगाव मध्ये देखील आमदाराच्या निकटच्या एका बिल्डरच्याच मुलाने काही दिवसांपूर्वी अपघात केला आहे त्याला अजूनही अटक झालेली नाही पुण्यामध्ये हे पशु दिले गेले नाही याचा अर्थ असा की जर तुम्ही उद्वेगाने किंवा हातबलतेने बंड कराल तरच तुमची दखल घेतली जाईल. अशा कायदा सुव्यवस्थेला काय पुजायचे आहे का? पोलीस पब मध्ये जाऊन हप्ता घेतो आणि वरून पुन्हा सती सावित्रीचा आव आणणारा नखरा करत असेल, तर अशा पोलिसांची तरी काय पूजा करायची का? हा प्रश्न आता पुणेकर विचारत आहेत.
पुणे तिथे काय उणे? असे म्हणतात. कल्याणी नगर मधील पोलिसांना असे वाटले असेल की, हे जे दोन आयटी इंजिनियर आहेत, यांच्याच नात्यातील भानगड उघड करावी, म्हणजे आपोआपच या पोर्शे कारच्या अपघाताकडे निव्वळ एक अपघात म्हणून पाहिले जाईल. परंतु ते पचलेच नाही. प्रकरण एवढे वाढले की, अग्रवालांचा खानदानी मस्तवालपणा उतरवला गेला. आणि फक्त अग्रवालाचाच खानदानी मस्तवालपणा नाही, तर आपल्या कर्तव्यापासून दूर जाणारा पोलिसांचाही मस्तवालपणा उतरवला गेला.
आजही गांधीवादी विचारसरणीने एखादा मुद्दा निकाली काढता येऊ शकतो. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणेकरांच्या सोबतीने अत्यंत सहजतेने ज्या पद्धतीने या प्रकरणातील कच्चे दुवे बाहेर काढले. धंगेकरांनी फांद्या छाटल्याच नाहीत. थेट खोडावर घाव घातला. थेट पोलीस आयुक्तावर आरोप केला आणि पोलीस खातेच डळमळले. फक्त पैसे फेकून यापुढे कोणतीही गोष्ट करता येणार नाही, कारण लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वासच उरलेला नाही. घटना वाढत गेल्या आणि लोकांनी बंड केलं तर त्यात वावगं वाटायचं कारण नाही.











