अमरावती : महान्यूज लाईव्ह
शासकीय अधिकारी उन्मत्त झाला, की त्याचे पाय बांधलेच पाहिजेत, गावाकडची एक जुनी म्हण प्रचलित आहे जिचा जागोजागी प्रत्यय येतो, ती म्हणजे जर वरमाईच शिंदळ असेल, तर वऱ्हाडाला नाव ठेवण्यात अर्थ काय? फक्त शेतकऱ्याचा फेरफार निश्चित करण्यासाठी जर तहसीलदारच 25 हजाराची लाच मागत असेल तर अशा तहसीलदाराला कामावर ठेवण्यात अर्थ काय? आणि दुसरीकडे रद्द झालेले लेआउट पुन्हा निश्चित करण्यासाठी तहसीलदारच धडपडत असेल तर त्याचा तरी काय उपयोग?
काल अमरावती जिल्ह्यात दोन तहसीलदारांवर कारवाई झाली. चांदूरबाजारची तहसीलदार गीतांजली गरड हिला 25 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले व अटक केली. तर दुसरीकडे अमरावती तालुक्याचा तहसीलदार विजय लोखंडे याला आयुक्तांनी रद्द केलेली लेआउटची शिफारस पुन्हा कायम केल्यावरून शासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे.
गीतांजली गरड यांनी तहसील कार्यालयात वावरणारा खाजगी व्यक्ती किरण दामोधर बेलसरे (२९, रा. शिरजगाव बंड) याच्यामार्फत तक्रारकर्त्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांनी लाच मागितल्याचे पडताळणीदरम्यान उघड झाले होते. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी तहसीलदार गीतांजली गरड व किरण बेलसरे यांना तहसील कार्यालयातून अटक केली.
चांदूर बाजारच्या तहसीलदार गीतांजली गरड हिची कहाणी आजची नाही, 28 मार्च 2024 रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. वडिलांच्या नावे असलेल्या शेतीचे वाटे पत्रानुसार फेरफार करण्याबाबतचा आदेश घेण्यासाठी हा शेतकरी तहसील कचेरीच्या चकरा मारत होता.
त्यावेळी तहसील कार्यालयात असणारा लिपिक किरण बेलसरे याने तहसीलदारासाठी व स्वतःसाठी मिळून 25 हजार रुपयांची लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली आणि तडजोडीअंती किरण बेलसरे याला वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
दुसरीकडे अमरावती तालुक्याचा तहसीलदार विजय लोखंडे याला थेट महसूल विभागानेच निलंबित केले आहे. अमरावतीच्या गोपाळ नगर भागातील संजय गव्हाळे यांनी त्याच्यासाठी तक्रार केली होती. तालुक्यातील वडद येथे टाकण्यात आलेले दोन लेआउट महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी रद्द केले होते मात्र मागील वर्षी रद्द केलेले हे लेआउट लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी एक दिवस पुन्हा मंजुरीसाठी नगररचनेच्या सहाय्यक संचालकांकडे मांडले होते. यात विजय लोखंडे दोषी आढळल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे.











