सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट पतसंस्थेच्या शंभर कोटींच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करणारा बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे स्वतःच लाचखोरीत अडकला. त्याच्या घरातून तब्बल एक कोटी 72 लाखांचं घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडलं आणि हरिभाऊ खाडे हा राज्यातच नव्हे, तर देशात चर्चेत आला. काल गुरुवारी हरिभाऊ खाडे हा पोलिसांना शरण आलेला आहे, मात्र या निमित्ताने त्याचं इंदापूर आणि बारामतीशी असलेलं कनेक्शन देखील समोर आलं आहे.
बहुतांश शासकीय अधिकारी हे लाचखोरी करताना त्यांच्या मालमत्ता या विविध शहरांमध्ये घेत असतात. हरिभाऊ खाडीने देखील नेमका तेच केले. इंदापूर मध्ये व्यापारी गाळा, एक फ्लॅट, तर बारामती मध्ये देखील त्याचे दोन फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. त्याची कागदपत्रे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केलेली आहेत.
गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी याच हरिभाऊ खाडेने दोन व्यवसायिकांकडे प्रत्येकी 50 लाख रुपयांची अशी मिळून एक कोटी रुपयांची लाच मागितली आणि हे डोक्यावरून गेलं, तेव्हा हाच हरिभाऊ खाडे स्वतःच लाचखोरीत सापडला. या हरिभाऊ खाडेकडे बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट पतसंस्थेतील शंभर कोटींच्या घोटाळ्याचा तपास होता.
यामध्ये बँकेची अध्यक्षा अनिता शिंदे हिला अटक करण्यात आली आहे, तर बबन शिंदे हा फरार आहे. या बबन शिंदेने बांधकामाचे साहित्य पुरवल्याप्रकरणी दोन व्यापाऱ्यांना 60 लाख रुपये दिले होते. या व्यापाऱ्यांची देखील या घोटाळ्यात चौकशी सुरू आहे, मात्र या व्यापाऱ्यांकडे हरिभाऊ खाडे हा लाच मागत होता. त्यामध्येही तडजोडीअंती 30 लाख रुपयांची लाच ठरली आणि त्यातील पहिला पाच लाख रुपयांचा हप्ता हरिभाऊ खाडेने कुशल जैन नावाच्या व्यापाऱ्याकडे देण्यास सांगितले.
हा हप्ता देत असताना कुशल जैन याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आणि तेथूनच हरिभाऊ खाडेचे ग्रह फिरले. हरिभाऊ खाडे च्या घरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने झाडाझडती घेतली, तेव्हा एक कोटी आठ लाख 72 हजार रुपयांची रोकड, तब्बल 72 लाख रुपयांचे सोने, पाच लाख रुपयांची चांदी असा ऐवज पोलिसांना आढळून आला, तर बारामती आणि इंदापूर सह परळीतील त्याच्या मालमत्तांची कागदपत्रे देखील पोलिसांच्या हाती सापडली.











