महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
प्रचंड घोषणाबाजी आणि अभूतपूर्व गोंधळात लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही कृषी विधेयक आज मंजूर झाले. ही विधेयके शेतकरी हिताविरोधात असल्याचे सांगत सरकारला घरचा आहेर देत सरकारमधील अन्न प्रक्रिया मंत्र्याने राजीनामा दिलेली हीच विधेयके आज मंजूर झाली.
ही विधेयके मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगत शेतकऱ्यांची गुलामी आपण तोडल्याचा दावा केला, तर विरोधकांनी ही लोकशाहीची हत्या असून हा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान करार शेती कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती व जीवनावश्यक वस्तू कायदा ही तीन विधेयके सरकारने दोन्ही सदनात मंजूर केली.
या विधेयकांच्या मंजूरीनंतर पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना आता दलालापासून मुक्ती मिळेल व त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या कायद्यानंतरही किमान हमी भावाची व्यवस्था यापुढेही सुरूच राहणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. या कायद्यांनी शेतकरी अधिक सशक्त होतील व गेली अनेक दशके आमचे शेतकरी बंधुभगिनी ज्या अनेक प्रकारच्या बंधनांत जखडले होते, ते आता मुक्त झाले आहेत, त्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास हा महत्वाचा दिवस ठरला आहे असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.
राज्यसभेत आजपर्यंत भाजपचे बहुमत नव्हते. मात्र भाजपच्या महत्वाकांक्षी कृषी विधेयकापूर्वी भाजपचे राज्यसभेतही बहुमत झाल्याने आज भाजपमध्ये उत्साहाची लाट होती.











