राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव (सा.मा.) येथे चक्रीवादळांना आणि मुसळधार पावसाने अक्षरक्ष: एक दीड तास तांडव घातले. या चक्रीवादळात जीवितहानी झाली नसली, तरी मोठी झाडे, विद्युत खांब व तारा ठिकठिकाणी पडल्या आहेत. घरावरही झाडे पडल्याने पडझड झाल्याची घटना घडली आहे.
रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पारगाव परिसरात चक्रीवादळ आले. अचानक आलेल्या या वादळाने काहींच्या घरावरची पत्रे उडून गेली. तर काहींच्या घरावर आणि रस्त्यावर मोठमोठी झाडे पडली. तर काही ठिकाणी विद्युत खांब विद्युत तारा जमीनदोस्त झाल्या.
दुसरीकडे जनावरांचा चारा असलेल्या कडवळ, मका, उस व इतर पिके सपाट झाल्याच्या घटना ठिकठिकाणी घडल्या. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे या वादळाने मोठे नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पारगावकरांना अंधारात रात्र काढावी लागणार आहे. मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या नैसर्गिक आपत्तीने पारगावकरांचे मोठे नुकसान केले. महावितरण, महसुल आणि कृषी विभागाने नुकसान ग्रस्तांची पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता नुकसानग्रस्त ग्रामस्थ, शेतकरी करीत आहेत.











