चाकण : महान्यूज लाईव्ह
गॅस सिलेंडरची चोरी करायचा धंदा काही फक्त ठराविक ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी अशा प्रकारचा चोऱ्यांचा प्रकार चालतो मात्र पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे चक्क एका कंटेनर मधून घरगुती आणि व्यवसायिक सिलेंडरची चोरी सुरू होती मात्र ही चोरी सुरू असतानाच भीषण असा स्फोट झाला. या घटनेने परिसर हादरून गेला.
शेल पिंपळगाव गावात पहाटे पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. एका ढाब्याच्या समोर कंटेनर मधून घरगुती आणि कमर्शियल सिलेंडर टाक्यांमध्ये गॅसची चोरी करायचे काम सुरू होते. अशातच गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळे आग भडकली. एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक करत सिलेंडर फुटले. मात्र हा धंदा करणारे कसाबसा जीव वाचवत पळून गेले.
स्फोटामुळे आग भडकली. हॉटेललाही आग लागली आणि तिथे उभ्या केलेल्या वाहनांना देखील आग लागली. या प्रचंड आवाजामुळे परिसर सगळा हादरून गेला. परिसरातील घरांना देखील तडे गेले. चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पोलिसांना या परिसरात चार ते पाच फुटलेल्या सिलेंडर टाक्या आढळून आल्या.











