कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह
राजकारणापायी माझं घर उध्वस्त झालं.. राजकारण नंतर करा, अगोदर आपापल्या पोटाचे बघा, कोणीही तुम्हाला मदत करणार नाही असे सांगत कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी राजीनामा देत राजकीय संन्यास घेतल्याचे जाहीर केले आणि यावेळी ते अक्षरश: रडले
जयकुमार शिंदे हे कोल्हापूरमध्ये परिचित आहेत, मात्र परिस्थिती पुढे हातबल झालेल्या शिंदे यांनी आपला निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला आणि आता आपण शरद पवारांची देखील ऐकणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. नव्या पिढीच्या राजकारणात येऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना, त्यांनी अगोदर तुमच्या पोटाचे बघा. त्यानंतरच राजकारणात या. कोणीही राजकीय नेता तुम्हाला मदत करत नसतो अशा स्वरूपाचा सल्ला देखील दिला आहे.
शिंदे हे पेशाने रिक्षा ड्रायव्हर आहेत. मात्र पक्षामध्ये निष्ठेने काम करत ते जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले. शिंदे यांनी सांगितले की, रिक्षा चालवत होतो, पद्मश्री प्रतापसिंह जाधव आणि छत्रपती मालोजीराजे यांनी वेळोवेळी मदत केली. जाधव यांनी रिक्षा घेऊन दिली, पण समाजसेवा एवढी होती की, लोक रिक्षातून फुकट प्रवास करायचे. शेवटी रिक्षा बंद करावी लागली.
आपण अशा पद्धतीने घरावर तुळशीपत्र ठेवून काम करत होतो, त्यामुळे फार नुकसान झाले. माझी घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. शरद पवारांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना माझ्या मुलाला नोकरीवर घेण्यास सांगितले. मुश्रीफांनी जिल्हा परिषदेत कंत्राटी नोकरी दिली, पण तीन-चार महिने पगार मिळत नव्हता. चांगला ठिकाणी मुलाला नोकरी द्या असे म्हटले. परंतु तिथे निराशाच पदरी पडली.
मुलगा नैराश्यात गेला. त्याच दरम्यान त्याच्या आईचे निधन झाल्याने, अचानक त्यानेही आत्महत्या केली. एवढी वर्ष राजकारणात एखाद्या पक्षाचे काम करून मी काय कमावले आणि काय गमावले असा प्रश्न करत शिंदे यांना रडु कोसळले.











