दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील मोहितेवस्ती परिसरात सोमवारी (दि १३) पहाटे बिबट्याने हल्ला केल्याने अंदाजे तीन वर्षाची एक गाय दगावली, तर एक गाय किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाटस परिसरातील मोहीते वस्ती येथील शेतकरी सतीश जनार्दन सांळुके यांच्या घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या दोन पाळीव गाईंवर सोमवारी पहाटे तीन – साडेतीन वाजण्याच्या आसपास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात एका गाईच्या पोटात आणि पाठीमागील बाजूला गंभीर जखम झाल्याने ती दगावली तर तिच्या शेजारीला गाईला कानाला आणि पाठीमागील बाजूस जखम झाली.
दरम्यान घटनेची माहिती कळवल्यानंतर वनरक्षक रामेश्वर तेलग्रे, वनकर्मचारी कोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी बिबट्याचा पायांच्या ठसांची पाहणी केली असता, दोन बिबट्या असून एक लहान आणि एक मोठ्या बिबट्याचा पायांचे ठसे असल्याचा अंदाज व्यक्त केला. या परिसरात मागील अनेक वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे.
मध्यतंरी बिबट्याचा वावर कमी झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनाही बिबट्या दिसला नाही, मात्र सोमवारी या परिसरात गाईंना लक्ष्य केल्याने पुन्हा या परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना बिबट्या भक्ष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे उघड्यावर बांधु नयेत, तारेचे संरक्षण करून गोठा किंवा सुरक्षित ठिकाणी बांधावीत. बिबट्या सदृश प्राणी आढळून आल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.











