नाशिक : महान्यूज लाईव्ह
दिंडोरी लोकसभा निवडणूकीत मोठी ट्विस्ट आला असून निलेश लंकेंनंतर आता विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे दिंडोरीत अचानक राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यासपीठावर दिसल्याने सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे, अगोदरच दिंडोरीत भारती पवार या कांद्याच्या मुद्दयावर शेतकऱ्यांच्या संतापाला सामोऱ्या जात असताना आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा आमदारही भास्कर भगरे यांच्या प्रचारात सहभागी दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दिंडोरीची लोकसभेची जागा आपल्याकडेच घ्या असा आग्रह नरहरी झिरवाळ यांनी धरला होता अशी चर्चा आहे, भाजपकडे ही जागा गेल्याने झिरवाळ नाराज झाल्याचीही चर्चा आहे. मात्र झिरवाळ यांच्यासारखा तगडा नेता विरोधात गेल्यास काय करायचे हा प्रश्न महायुतीपुढे निर्माण होणार आहे. कारण दिंडोरी तालुक्यात नरहरी झिरवाळ यांची मोठी ताकद आहे.
याची चर्चा होण्याचे कारण म्हणजे दिंडोरी तालुक्यातील तिसगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे गुरूजी यांच्या प्रचारार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नरहरी झिरवाळ दिसून आले. येत्या २० मे रोजी होणाऱ्या या मतदानाच्या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांची नाराजी महायुतीचे नेते कशी काढतात याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे.











