पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवल्याचा आरोप कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. या संदर्भातील तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आणि त्याची दाखल निवडणूक आयोगाने घेतली.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भात तपासणी केला असता, बँकेच्या मॅनेजरने सहकार्य केले नाही, मात्र सीसीटीव्ही फुटेज जे निवडणूक आयोगाने मिळवले, त्यामध्ये 40 ते 50 व्यक्ती या बँकेमध्ये रात्रीच्या वेळी आत बाहेर करत असल्याचे दिसून आले. त्यावरून निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. कविता द्विवेदी यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे.
दरम्यान या संदर्भात निवडणूक आयोगाने दखल घेतली म्हणून आमदार रोहित पवार यांनी देखील निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाची मतदानाची तारीख काल सात मे रोजी होती. मात्र सहा मे च्या रात्री उशिरापर्यंत ते सात मे च्या पहाटेपर्यंत पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील वेल्हे शाखा सुरू होती. या संदर्भातील रात्रीचे छायाचित्र देखील महाविकास आघाडीने प्रसारित केले होते.
या संदर्भात अजित पवारांना देखील प्रश्न विचारण्यात आले होते, मात्र अजित पवारांनी ते नाकारले होते. अजित पवारांनी पत्रकारांनाच प्रश्न विचारला होता की, तुम्ही स्वतः देखील पाहिला आहे का? मात्र आता निवडणूक आयोगानेच यावर ॲक्शन घेतले असल्याने रोहित पवारांनी केलेल्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे. रोहित पवारांनी भोरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप केला होता.











