घराशेजारील शेततळी सांभाळा… इंदापूर तालुक्यातील सहा महिन्यातील तिसरी घटना
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर मात करायची म्हणून शेतकऱ्यांनी शेततळी तर खोदलीत, मात्र कुटुंबाच्या, पर्यायाने आपल्या मुलांच्या भरभराटी, प्रगतीसाठी खोदलेली शेततळी सुरक्षित नसल्याचे दिसू लागले आहे. वडापुरी येथे शेततळ्याच्या शेजारी खेळण्यास गेलेली दोन मुले दोन दिवसांपूर्वी पाण्यात बुडाली आणि एक हसतेखेळते कुटुंब उध्वस्त झाले.
तालुक्यातील वडापुरी येथे शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडापुरी येथील शिर्केवस्ती येथे ही १७ सप्टेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. अविष्कार किशोर शिर्के (वय ९ वर्षे) आणि अधिराज उर्फ ध्रुव किशोर शिर्के (वय ७ वर्षे) या दोन भावंडांचा खेळता खेळता पाण्यात पडून दुर्दैवी अंत झाला.
१७ सप्टेंबर रोजी दुपारी खेळण्याच्या निमित्ताने अविष्कारस, अधिराज व त्यांचा चुलतभाऊ नाथ प्रल्हाद शिर्के हे तिघे दुपारी एकच्या सुमारास शेततळ्याच्या बाजूला गेले. खेळता खेळता तोल जाऊन ते पाण्यात बुडाले. काही कळण्याच्या आतच ही घटना घडल्याने नऊ वर्षाचा असूनही नाथ याने प्रसंगावधान राखत घराकडे पळत ही घटना सांगितली. कुटुंबियांनी लागलीच धाव घेत मुलांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.
कोरोनाच्या महामारीत मुले सुरक्षित ठेवण्यासाठी पालक आटोकाट प्रयत्न करीत आहेत, मात्र दुर्देवाचे दशावतार पाठ सोडत नाहीत, शेतकऱ्यांना शेतीतील अनास्थेने अडचणीत आणले आहे आणि शेतीत प्रगती साधण्यासाठीची साधने जीवावर उठताना पाहून मनाची कालवाकालव होते. वडापुरी येथील शिर्के कुटुंबियांवर झालेला हा आघात भरून न येणारा असाच आहे.
वडापुरी येथील घटनेने इंदापूर तालुक्यातील अनेक कुटुंबांना पुढील धोक्याची जाणीव करून दिली आहे. यापूर्वीही देखील निरगुडे येथील शेततळ्यात शेतमजूर कुटुंबातील मुले बुडाली होती. शेळगाव येथे विहीरीत दोन भावंडे पडून बुडाली होती. या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.










