दौंड, महान्यूज लाईव्ह
महायुतीत घटक मित्रपक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दौंडमध्ये त्यांच्या कार्य त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोराचा धक्का दिला आहे. दौंड शहर व तालुक्यातील आरपीआयच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, बारामती मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी ठिकठिकाणी सभा घेणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दौंड मध्ये कार्यकर्त्यांनी एक प्रकारे घरचा आहेर दिला आहे. शनिवारी (दि ४ )दौंड तालुक्यातील वरवंड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली.
या सभेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना दौंड आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबाचे पत्र दिले. यामुळे दौंड आरपीआय आठवले गटात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे देशभरात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चालविलेल्या धर्मांध जातीयवादाच्या विरोधात लढा देत आहेत.
याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत असून आपण शिव, फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारांची मशाल तेवत ठेवण्याचे काम अविरतपणे करत आहात व सन २०२४ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करणाऱ्या जातीयवादी शक्तीच्या विरोधात उभे आहात. याकरिता आम्ही संविधानाच्या संरक्षणाकरिता बारामती लोकसभा मतदारसंघातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरी अनुयायी बारामती लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना बिनशर्त जाहीर पाठींबा देत आहोत.
या पत्रावर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माजी सभापती निता कदम, आरपीआयचे जिल्हा संघटक भारत सरोदे, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती विकास कदम, नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग गायकवाड, आरपीआय अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष मोजेस पॉल, शहर सरचिटणीस सुभाष शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.