पुणे, महान्यूज लाईव्ह
पुणे येथील जुन्या कात्रज घाटात रुग्णांचे रक्ताच्या नमुने घेतलेले इंजेक्शन आणि बाटल्या रस्त्याच्या कडेला विचित्र अवस्थेत फेकून देण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी महानगरपालिकेने एन. एम. हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅबवर एक लाखांचा दंड ठोठावला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,
जुन्या कात्रज घाटात रस्त्याच्या कडेला इंजेक्शन आणि रक्त तपासणी केलेल्या बाटल्या व इतर औषधांचा साठा पोत्यात भरून टाकला असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी आढळून आला होता. याबाबत प्राणी मित्र बाळासाहेब ढमाले यांनी त्याचा व्हिडिओ आणि छायाचित्र काढून महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडे तक्रार केली.
या प्रकाराची महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी गांभीर्याने दखल घेतली. रक्त तपासणी ट्यूबवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी लॅबचा शोध घेतला असता, धनकवडी येथील के. के. मार्केट परिसरातील नीलम पाटील मालक असलेल्या एन. एम. हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅबच्या असल्याचे समोर आले.
रुग्णांचे रक्त तपासणीसाठी घेतल्यानंतर उर्वरित नमुन्यांच्या बाटल्या भरलेली पोती जुन्या कात्रज घाटात टाकून दिले होते. जैववैद्यकीय कचरा प्रक्रियेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या लॅबवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावून तातडीने हा कचरा उचलण्यास भाग पाडले. दरम्यान, पुण्यातील कारखान्यातील कामगारांची वैद्यकीय तपासणी करणारी अग्रगण्य कंपनी आहे, ही कंपनी कामगारांचे वैद्यकीय तपासणीच्या नावाने गोळा केलेले रक्ताचे नमुने कोणतीही प्रक्रिया न करता व रक्ताचे नमुने न तपासता कात्रज घाट व इतर ठिकाणी फेकून देते व कारखान्यांना कामगारांचे रक्ताचे खोटे रिपोर्ट दिले जातात अशा प्रकारामुळे कामगारांच्या आरोग्य सोबत व पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून कंपनीच्या कामगारांसोबत इतर नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे .
याबाबत कामगारमंत्री, कामगार विभागातील अधिकारी, पोलीस प्रशासन आरोग्य विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
कामगारांच्या आरोग्याशी व पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या एन. एम. हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅब व या लॅबचे मालक निलम पाटील याच्यावर गुन्हा दाखल करुन ठोस कारवाई न झाल्यास कामगार व पर्यावरणवादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.











