उन्हाळ्याच्या बोधकथा – २
घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर हे शिवकाळाच्या पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे इतिहासाच्या जाणकारांचे म्हणणे आहे. पण बारामतीला एका शहराचे रुप देऊन बारामतीचे नाव देशाच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचे पहिले श्रेय हे बाबुजी नाईक यांचे आहे.
शाहू महाराजांनी बाबुजी नाईकांच्या वडिलांना बारामतीचा भाग सोपवला. मात्र बारामती खऱ्या अर्थाने सजली ती बाबुजी नाईकांच्या काळात. पेशव्यांचे सावकार असे बाबुजी नाईकांचे वर्णन होत असले तरी दिल्लीपासून तामिळनाडूपर्यंतच्या अनेक युद्धात ते एक शूर सरदार या नात्याने सहभागी असल्याचे दिसते. बारामतीतील बाबुजी नाईकांचा भव्य वाडा, मेडदचा किल्ला हे त्यांच्या त्यावेळच्या ताकदीचे दर्शन घडवितात. मोरोपंतांसारख्या कवीला त्यांनी आश्रय दिला, त्यातून केकावलीसारख्या रचना निर्माण झाल्या. त्यावेळीच बारामतीच्या कसब्यातील वाडे, बारामतीच्या पेठांची रचना बाबुजी नाईकांच्या काळात झाली. बारामतीतील मंदिरे पुरातन असली तरी त्यांचे आज जे स्वरुप आहे ते बाबुजी नाईकांनी केलेल्या जिर्णोद्धारामुळे आपल्याला दिसते आहे. याखेरीज बारामतीत अनेक मंदिरे अशी आहेत जी स्वत: त्यांनी उभी केलेली आहेत. बाबुजी नाईकांमुळे त्यावेळच्या बारामतीचे नाव दिल्लीपर्यंत घेतले जात होते. इतिहासाच्या पानांवर बाबुजी नाईकांचे नाव हे बारामतीकर म्हणूनच घेतले जात असल्याचे आपल्याला दिसते. बागा, तळी, नदीकाठाचे घाट अशा त्या काळातील परिपूर्ण शहराचे रुप बारामतीला देण्याचे पहिले श्रेय आपल्याला बाबुजी नाईकांना द्यावेच लागेल.
नोंद घेण्याजोगी आणखी एक बाब म्हणजे बारामतीचे खऱ्या अर्थाने संस्थापक असणाऱ्या बाबुजी नाईकांच्या वंशजाच्या नावाची १ गुंठाही जमीन आज बारामतीत नाही. बारामती शहर हे बाबुजी नाईकांची देन आहे हे बारामतीत राहणाऱ्या बहुतेक लोकांना माहिती नाही. काळाची ताकद फार मोठी असते.











